परतवाड्यात नागरिकांची खरेदीसाठी धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:11 AM2021-05-17T04:11:38+5:302021-05-17T04:11:38+5:30
नरेंद्र जावरे - परतवाडा : एक दोन नव्हे, तर तब्बल आठ दिवसांपासून घरात बंद असलेल्या नागरिकांनी नाही, हो म्हणत ...
नरेंद्र जावरे - परतवाडा : एक दोन नव्हे, तर तब्बल आठ दिवसांपासून घरात बंद असलेल्या नागरिकांनी नाही, हो म्हणत रविवारी तासाभरासाठी बाजारात येऊन पुन्हा आठ दिवसांच्या भाज्यांसह इतर आवश्यक खरेदी आटोपली. पण, खरेदी करताना प्रत्येकाच्या मनात कोरोनाची भीती प्रकर्षाने जाणवत होती.
जिल्ह्यात औषध वगळता सर्वच व्यवहार पूर्णत: बंद आहेत. इतर व्यवहारांसाठी पार्सल सेवा असली तरी परतवाडासारख्या शहरात अल्प प्रमाणात ती आहे. त्यामुळे स्लम एरियासह शहराला लागून असलेल्या इतर ग्रामीण भागातील नागरिकांचा संपर्क थेट परतवाडा शहराशी येतो. सुईपासून तर प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना परतवाड्यात यावे लागते. कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढल्याने जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध घातले आहेत. नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई असल्यामुळे अनेकांची कुचंबणा होत आहे. अशात रविवारी नागरिकांनी पुन्हा आठ दिवसांच्या पालेभाज्या, किराणा व इतर साहित्यासाठी शहरातील मध्यवस्तीत असलेल्या गुजरी बाजार परिसरात हजेरी लावली होती.
भाजीपाल्याची मुबलक खरेदी
सर्व व्यवहार ठप्प असल्याने बागायतदार, भाज्यांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा माल शेतातच सडत असल्याचेही चित्र आहे. पालेभाजी खरेदीसाठी नागरिक आठवडी बाजार आणि येथील मुख्य गुजरी बाजारातच हजेरी लावतात. रविवारीसुद्धा तेथे हातठेल्यावर नेहमीप्रमाणेच पालेभाज्या गड्डीने विकायला होत्या. त्यात पाच रुपयांची पालक, दहा रुपयांची कोथिंबीर, चवळी, घोळ, मेथी, शेपू आदी भाज्यांचा समावेश होता. नागरिकांनी आठवड्याचे लॉकडाऊन पाहता, या भाज्या जास्त प्रमाणात खरेदी केल्या.
जिवाची भीती, पण ताटात हवेच
खरेदीसाठी गर्दी झाल्याने कोरोनाची दहशत वजा भीती प्रकर्षाने या बाजारात दिसत होती. पालिकेचे पथक व पोलिसांचा बंदोबस्त होता. मात्र, रोजच्या जेवणात आवश्यक असलेल्या भाज्यांची खरेदी करणे भाग होते. प्रत्येक जण तात्काळ खरेदी करून तेवढ्याच त्वरेने घरी जाण्याच्या प्रयत्नात दिसत होता. भाजीपाला खरेदीसाठी यावेच लागले. जेवणात रोज काहीतरी वेगळे पाहिजे हो, हा नागरिकांचा एकमेकांशी संवाद बरच काही सांगून जात होता.