अमरावतीत अवेळी पाणी; झोपेचे खोबरे! नियोजनात मजीप्र 'फेल', नागरिक हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2022 03:45 PM2022-05-14T15:45:43+5:302022-05-14T15:50:31+5:30
अपुरा पुरवठा, अनियोजित वेळी येणारे नळ यामुळे शहरातील पाणीपुरवठ्याचा पुरता विचका झाल्याचा अनुभव अमरावतीकरांना येत आहे.
मनीष तसरे
अमरावती : शहराची तहान भागविणारा एकमेव तलाव म्हणजे माेर्शी येथील अप्पर वर्धा धरण होय. मागील वर्षी पाऊस चांगला झाल्याने नलदमयंती तलाव हा शंभर टक्के पूर्ण भरला होता. याच धरणातून अमरावती शहराला पाणीपुरवठा केला जातो. मात्र, सद्य:स्थितीत धरणात फक्त पन्नास टक्केच पाणी शिल्लक आहे. हे पाणी शहराची तहान भागविण्याकरिता पुरेसे असले तरी अपुरा पुरवठा, अनियोजित वेळी येणारे नळ यामुळे शहरातील पाणीपुरवठ्याचा पुरता विचका झाल्याचा अनुभव अमरावतीकरांना येत आहे.
अमरावती शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. उन्हाळा असल्याने पाण्याची गरज जास्त भासत आहे. मात्र शहरात दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे तर काही ठिकाणी दोन दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो. तोही नियमित केला जात नसल्याने लोकांची प्रचंड नाराजी आहे. पूर्ण एक तासही नळाला पाणी येत नसल्याचे शहरातील महावीर नगर, नरसिंह कॉलनी, मच्छगंधा कॉलनी तसेच बडनेरा येथील आठवडी बाजार, अशोक नगर, राहुल नगर, नवी वस्ती बडनेरा या लोकवस्तीत पिण्याचे पाणी कमी दाबाने मिळते.
२०२३ मधील नियोजन आत्ताच
अमरावती शहर हे ड वर्ग महानगरपालिका असून, सध्याची लोकसंख्या ही जवळपास ८ लक्ष इतकी आहे. शहरापासून ५५ किलोमीटर लांब असलेल्या मोर्शी येथील अप्पर वर्धा धरणाच्या जलाशयातून पाणीपुरवठा करणारी योजना ही १९९४ मधील आहे. त्यानंतर २०१६-२०१७ मध्ये अमृत अभियान अंतर्गत अमरावती शहराकरिता २०३३ ची लोकसंख्या ८,८३,९५४ इतकी गृहीत धरून प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र ती स्थिती आजच निर्माण झाली आहे.
पुन्हा आंदोलन ?
शिदोरी उशाशी अन् माणसे उपाशी अशी स्थिती अमरावतीकरांवर ओढवली आहे. अमरावती शहराची भरभराट होत आहे. टोलेगंज इमारती उभ्या होत आहेत. या शहरात वास्तव्यासाठी लोक उत्सूक आहेत. पाण्यासाठी मात्र, आंदोलन करायचे का, हा प्रश्न आता उभा ठाकला आहे.
उन्हाळा असल्याने पाण्याची वाढली मागणी
अमरावती शहरात पाणीपुरवठा करण्याकरिता अप्पर झोन व लोअर झोन अशी विभागणी केली आहे. त्यानुसार पाण्याचे नियोजन केले जात आहे. पाण्याचे प्रेशर काही ठिकाणी कमी आहे. शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या मोर्शी येथील अप्पर धरणावर नियमित ४ पंपाव्दारे पाणी घेतले जात आहे. मात्र मागणी वाढल्याने एक पंप पुढील आठवड्यात सुरू होईल. मात्र पाईपलाईन जुनी असल्याने त्यावर प्रेशर येऊ न म्हणून काळजी घेत आहे.
-विवेक सोळंके, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण
आमच्याकडे नळाला पिण्याचे पाणी येण्याची वेळ निश्चित नाही. आले तरी पूर्ण पाणीसुद्धा भरून होत नाही तोच पाणी जाते. पाणी येईल म्हणून कोणाला तरी घरीच थांबावे लागते.
- रेखा मानकर
नळाला पाणी येण्याची वेळ निश्चित नाही. कधी रात्री ११ तर कधी १२ वाजता पाणी येते. त्यामुळे कामावरून आल्यानंतर रात्री पाण्याची वाट पाहावी लागते. पूर्ण भरून होण्याआधीच ते जाते. आम्ही अनेकदा तक्रारदेखील केली आहे.
- शिवंगी वेळूरकर