तालुक्यातील नागरिक 'कोव्हॅक्सिन' च्या दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:12 AM2021-05-08T04:12:40+5:302021-05-08T04:12:40+5:30
कोव्हिशिल्ड' आणि 'कोव्हॅक्सिन' लसीकरण १६ जानेवारीपासून सुरू झाले. शरीरामध्ये अँटिबॉडीज तयार होऊन लस परिणामकारक ठरण्यासाठी पहिला डोज घेतल्यानंतर ...
कोव्हिशिल्ड' आणि 'कोव्हॅक्सिन' लसीकरण १६ जानेवारीपासून सुरू झाले. शरीरामध्ये अँटिबॉडीज तयार होऊन लस परिणामकारक ठरण्यासाठी पहिला डोज घेतल्यानंतर सहा ते आठ आठवड्यांनी दुसरा डोज घेणे अपेक्षित असल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाने स्पष्ट केले. मात्र, तालुक्यातील नागरिक कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोजच्या प्रतीक्षेत आहे. एक महिना उलटूनही गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लस नसल्याने नागरिकांना आल्यापावली परत जावे लागत आहे.
लशीच्या दुसऱ्या डोजला ‘बूस्टर डोज’ असे म्हटले जाते. म्हणजे पहिल्या डोजला पूरक आणि व त्याची ताकद वाढवणारा डोस. पहिला डोज संसर्गाचा धोका कमी करीत असला तरी दुसरा डोजही आवश्यक आहे. लसीचा पहिला डोज घेतलेल्या व्यक्तींना लशीच्या तुटवड्यामुळे दुसरा डोज वेळेत मिळाला नाही तर काय करायचे, याचा आरोग्यावर काही परिणाम होऊ शकतो का, दुसरा डोज मिळाला नाही, तर कोरोना विषाणूशी लढण्यासाठी आवश्यक अँटीबॉडी तयार होणार नाहीत का आणि पहिला डोज एका लशीचा घेतला, आणि ती लस उपलब्ध नसेल, तर दुसरा डोज वेगळ्या लशीचा घ्यायचा का, असे अनेक प्रश्न सर्वसामान्य नागरिकांचे आहेत. चांगल्या प्रतिकारशक्तीसाठी दोन्ही डोज नमूद कालावधीत घेतले गेले पाहिजे तसेच दोन्ही डोज एकाच कंपनीचे असावे, असे आरोग्य प्रशासनाने सांगितले असले तरीही नागरिकांची प्रतीक्षा मात्र कायम आहे.