ग्रामीण रुग्णालयात नागरिकांचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 11:26 PM2018-01-21T23:26:41+5:302018-01-21T23:27:10+5:30
आॅनलाईन लोकमत
वरूड : शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास पुसलाकडून येणाऱ्या टिप्परने दुचाकीला धडक दिली. यात दोघे ठार, तर तिसरा गंभीर जखमी झाला. रस्त्याचे काम सुरू असल्याने वरूडमध्ये अपघातांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरला असून, अपघातामुळे तो उफाळून आला. परिणामी रविवारी नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयासमोर ठिय्या दिला. यावेळी काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
शनिवारी झालेल्या अपघातात सिद्धार्थ काशीराव रामटेके (३५ रा. हातुर्णा), मोरेश्वर रामराव शेरेकर (४५ रा. वाठोडा) यांचा मृत्यू झाला, तर दिनेश कुऱ्हाडे (शेंदूरजनाघाट) गंभीर जखमी असल्याने नागपूरला रेफर करण्यात आले. मृतदेहाचे रविवारी सकाळी शवविच्छेदन करण्यात आले. मात्र, या अपघातासाठी रस्ता बांधकाम करणारी कपंनी जबाबदार असल्याने १० लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करीत मृताच्या नातलगांसह राजकीय पक्षाच्या नेत्यांनी ठिय्या दिला. आ. अनिल बोंडे यांनी कंपनीच्या मालकांशी संवाद साधून मृताच्या नातेवाइकांना १० लाख रुपये आणि गंभीर जखमींना उपचाराचा खर्च देण्याचे आश्वासन मिळविले. यानंतर तणाव निवळला.
ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक प्रमोद पोतदार यांनी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातलगांच्या ताब्यात दिले. त्यांना रुग्णवाहिका देण्यात आली. तणावाची स्थिती पाहता तहसीलदार आशिष बिजवल, नायब तहसीलदार कमलाकर देशमुख, ठाणेदार गोरख दिवे, शेंदूरजनाघाटचे ठाणेदार शेषराव नितनवरे, सहायक पोलीस निरीक्षक विजय शिंगाडे, उपनिरीक्षक दिलीप श्रीराव यांनी तगडा बंदोबस्त ठेवला.
आमदारांची गाडी अडविली
मृतांच्या नातेवाइकांचे सांत्वन करण्याकरिता आलेले आमदार बोंडे यांनी डॉक्टरांकडे विचारणा केली, तर मृतांच्या नातलगांची त्यांनी विचारपूस केली नसल्याने संतापलेल्या नागरिकांसह माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे, स्वाभिमानीचे देवेंद्र भुयार यांनी आमदारांची गाडी रोखून धरली. मृतांच्या नातलगांना दहा लाखांची मदत मिळवून द्या, अशी मागणी त्यांनी केली.
कारवाईची मागणी!
एस.जी. इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा कामातील हलगर्जीपणा नागरिकांच्या जिवावर बेतत आहे. अनेकांना अपंगत्व आले, तर काहींचा मृत्यू झाला. याप्रकरणी कंपनीसह प्रशासनातील अधिकाºयांवरसुद्धा सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी काँग्रेसचे नेते नरेशचंद्र ठाकरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवेंद्र भुयार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ कुकडे, कार्याध्यक्ष बाळू पाटील, गिरीश कराळे ,माजी सभापती नीलेश मगर्दे, सभापती विक्रम ठाकरे, विनोद धरमठोक, धनंजय बोकडे आदींनी केली.