विदर्भात तीन ठिकाणी साकारणार ‘सिट्रस इस्टेट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 09:07 PM2019-03-08T21:07:12+5:302019-03-08T21:09:44+5:30

संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताकरिता विदर्भातील तीन ठिकाणी ‘सिट्रस इस्टेट’ साकारले जाणार आहेत. या महत्त्वपूर्ण निर्णयावर राज्य मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले आहे.

'Citrus Estate' to be set up at three places in Vidarbha | विदर्भात तीन ठिकाणी साकारणार ‘सिट्रस इस्टेट’

विदर्भात तीन ठिकाणी साकारणार ‘सिट्रस इस्टेट’

Next
ठळक मुद्देपंजाबच्या धर्तीवर अंमलबजावणी कलम निर्मिती ते विक्रीपर्यंत व्यवस्थापन

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताकरिता विदर्भातील तीन ठिकाणी ‘सिट्रस इस्टेट’ साकारले जाणार आहेत. या महत्त्वपूर्ण निर्णयावर राज्य मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले. मोर्शी तालुक्यातील उमरखेड, काटोल तालुक्यातील धिवरवाडी व वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील तळेगाव येथे या सिट्रस इस्टेटची उभारणी केली जाणार आहे. या तिन्ही प्रकल्पांसाठी ३४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
संत्रा, मोसंबीचे उत्पादन वाढविण्यापासून ते विक्रीपर्यंतची व्यवस्था विकसित करण्यासाठी पंजाबच्या धर्तीवर विदर्भातील नागपूर, अमरावती व अकोला हा परिसर ‘सिट्रस इस्टेट’ म्हणून विकसित केला जाईल.
पंजाबमध्ये ६० हजार हेक्टरवर संत्र्याच्या किन्नो जातीची लागवड आहे. तेथे हेक्टरी २२ ते २५ टन उत्पादन होते. विदर्भात मात्र ही उत्पादकता सात ते आठ टन आहे. पंजाबमध्ये ‘सिट्रस इस्टेट’च्या माध्यमातून संत्रा उत्पादकांना संत्रा कलम तयार करण्यापासून ते विक्री व्यवस्थापनापर्यंत मार्गदर्शन केले जाते. त्याच धर्तीवर विदर्भातही मदत व्हावी म्हणून सात-आठ वर्षांपासून महाऑरेंज प्रयत्न करीत आहे. आता त्याला आकार आला आहे.

विदर्भात १.३४ लाख हेक्टर क्षेत्रावर फळपिके
राज्यात संत्रा, मोसंबी या फळपिकांचे क्षेत्र विदर्भामध्ये जास्त आहे. विदर्भात एकूण १.३४ लाख हेक्टर क्षेत्र या फळपिकांखाली आहे. संत्रा पिकाखालील क्षेत्राच्या तुलनेत त्याचे उत्पादन व उत्पादकता कमी आहे. ही बाब लक्षात घेऊन संत्र्याची उत्पादकता व दर्जा वाढविण्यासाठी पंजाब राज्याप्रमाणे महाराष्ट्रातही सिट्रस इस्टेट निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सिट्रस इस्टेटमध्ये काय?
संत्रा लागवड असलेल्या जिल्ह्यांमध्ये संत्र्यांच्या दर्जेदार कलमांची निर्मिती. नवीन जाती विकसित करणे, रोग प्रतिबंधक करण्याविषयी मार्गदर्शन. उच्च दर्जाच्या फळांची निर्मिती, त्याचे ग्रेडिंग व कोटिंग, विक्री व्यवस्थापनास मार्गदर्शन. शेतक-यांना संत्रा उत्पादन व विपणनाची आधुनिक तंत्रे शिकविण्यासाठी तज्ज्ञांची सेवा देणे. संत्रा लागवड व पीक काढणीसाठी लागणारी विविध यंत्रे भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देणे. रोगराईच्या उच्चाटनासाठी प्रयोगशाळा व प्लँट हेल्थ क्लिनिक, शीतगृहांची उभारणी, उत्तम दर्जाचे पॅकेजिंग साहित्य पुरविणे.

महाऑरेंजने यासंबंधी प्रस्ताव शासनास दिला होता. ‘लोकमत’च्या वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलमध्ये त्या प्रस्तावाबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शविली होती. विदर्भात तीन ठिकाणी सिट्रस इस्टेट स्थापन करण्याच्या निर्णयाचा लाभ संत्रा उत्पादकांना होईल.
- श्रीधर ठाकरे, अध्यक्ष, महाऑरेंज

विदर्भात तीन ठिकाणी सिट्रस इस्टेट उभारण्याचा निर्णयावर मंत्रिमंडळाने मंगळवारी मोहोर उमटविली. विदर्भासाठी हा अत्यंत पुरोगामी निर्णय आहे. महाऑरेंजने समन्वय साधून शेतकऱ्यांना या प्रकल्पाशी जुळावून घ्यावे. अचूक मार्गदर्शनाने संत्रा उत्पादन अधिक गुणवत्तेचे होईल.
- रवींद्र ठाकरे, संचालक, वनामती, नागपूर

Web Title: 'Citrus Estate' to be set up at three places in Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती