शहर बससेवेचे ‘आॅन दी स्पॉट’ इन्स्पेक्शन !
By admin | Published: April 11, 2017 12:24 AM2017-04-11T00:24:19+5:302017-04-11T00:24:19+5:30
‘पृथ्वी टुर्स अँड ट्रॅव्हल्स’ या खासगी अभिकर्त्याच्या माध्यमातून सुरू असलेल्या शहर बससेवेची आकस्मिक तपासणी होणार आहे.
उपायुक्तांच्या नेतृत्वात समिती : उपायुक्तांनी दिले आदेश
अमरावती : ‘पृथ्वी टुर्स अँड ट्रॅव्हल्स’ या खासगी अभिकर्त्याच्या माध्यमातून सुरू असलेल्या शहर बससेवेची आकस्मिक तपासणी होणार आहे. आयुक्तांनी ही जबाबदारी उपायुक्त नरेंद्र वानखडे यांच्या नेतृत्वातील पथकाला दिली आहे. ‘शहर बस’ उपक्रम शहरातील सर्व मार्गांवर सुरळीत तसेच प्रभावीपणे सुरू असल्याची खात्री करण्यासाठी हे आदेश पारित करण्यात आले आहेत.
अकोला येथील कंपनीशी असलेला करार संपुष्टात आल्यानंतर शहर बस वाहतुकीची जबाबदारी बिपिन चव्हाण यांच्या ‘पृथ्वी टुर्स अँड ट्रॅव्हल्स’वर सोपविण्यात आली. २५ मे २०१६ पासून ‘पृथ्वी टुर्स’च्या २५ शहरबसेसच्या माध्यमातून ही सेवा सुरू करण्यात आली. सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आले. तथापि करारनाम्याप्रमाणे ‘पृथ्वी’ने अद्यापही छोट्या बस आणण्याच्या करारनाम्यातील अटींची पूर्तता केली नाही.
दररोज होणार बसेसची तपासणी
अमरावती : त्या २५ बसेसच्या माध्यमातून ‘पृथ्वी टुर्स अँड ट्रॅव्हल्स’ शहरबस वाहतूक उपक्रम सुरळीत चालवित आहे काय, याची तपासणी करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. विशेष म्हणजे वानखडे यांच्या नेतृत्वातील हे पथक आकस्मिक पाहणी करेल. अभिकर्त्यांनी अधिकची तिकिटे छापली आहेत काय किंवा ‘एक्स्ट्रा टाईम’ वाहतूक होते का, याची तपासणी ‘आॅन दि स्पॉट’ होणार आहे. शहर बसवाहतूक अधिक सक्षम व्हावी, प्रवाशांच्या सोईच्या दृष्टीने ही बससेवा असून प्रवाशांची गैरसोय होऊ नये, अशा पद्धतीने दररोज या बसेसची तपासणी करावी व माहिती संकलित करून कार्यशाळा विभागाला द्यावी, असे आयुक्त हेमंत पवार यांनी स्पष्ट केले
रॉयल्टी
शहर बससेवेच्या माध्यमातून महापालिकेला पृथ्वी ट्रॅव्हल्सकडून महिन्याकाठी ६ ते साडेसहा लाख रॉयल्टी मिळते. तुर्तास महापालिका हद्दीतील १६ रस्त्यांवर २५ शहरबसेस धावतात. ५.२२ रुपये प्रति किलोमीटर दराने मनपाला रॉयल्टी प्राप्त होत आहे.
पथकात यांचा समावेश
उपायुक्त (सामान्य) नरेंद्र वानखडे यांच्या नेतृत्वातील तपासणी पथकात पशुशल्य चिकित्सक सुधीर गावंडे, सचिन बोंद्रे, उद्यान अधीक्षक प्रमोद येवतीकर, उपअभियंता स्वप्निल जसवंते आणि निरीक्षक उमेश सवई यांचा समावेश आहे.