शहरातील फलकबाज अंगावर !
By admin | Published: July 11, 2017 12:04 AM2017-07-11T00:04:28+5:302017-07-11T00:04:28+5:30
मध्यवर्ती चौकांसह शहरातील गल्लीबोळात फलकबाजांनी अक्षरश: थैमान घातले आहे.
महापालिका ‘धृतराष्ट्र ’ : फलकांचे बेकायदेशीर अतिक्रमण
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मध्यवर्ती चौकांसह शहरातील गल्लीबोळात फलकबाजांनी अक्षरश: थैमान घातले आहे. राजकमल चौक व अन्य मध्यवर्ती चौकातील ही फलकबाजी अमरावतीकरांच्या अंगावर आली असताना महापालिकेचा बाजार व परवाना विभाग धृतराष्ट्र बनल्याने नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
फलकबाजांचे वाढते अतिक्रमण वाहतुकीला अडचणीचे ठरले असताना त्यांचेविरूद्ध कारवाई करण्याची बिशाद नसल्याने याफलकबाजांचे फावले आहे. महापालिकेला एखाद्या मोठ्या अपघाताची प्रतीक्षा तर नाही ना, अशी शंका घेण्याइतपत मध्यवर्ती चौकातील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. राजकमल चौकातील उड्डाणपूल, जयस्तंभ चौकस्थित महात्मा गांधी पुतळा परिसर, चित्रा चौक स्थित महात्मा फुले पुतळा परिसर आणि नागपुरी गेट चौकातील सौंदर्यीकरण परिसरात कुठल्याही प्रकारचे फलक वा बॅनर लावण्यास बंदी आहे. मनपाने तसे सूचना फलक लावले आहेत. मात्र, मनपाची ही सूचना अव्हेरून शहरातील फलकबाजांनी नेमके याच परिसराला लक्ष्य केले आहे. राजकमल चौकाकडून बडनेराकडे जाणाऱ्या मार्गावर व सीतारामबाबा संकुलाच्या कॉर्नरवर हटकून दररोज वेगवेगळे बॅनर व पोस्टर्स लावले जातात.
याठिकाणी पोस्टर लावण्याची अहमहमिका चालते. एकाच्या वाढदिवसाचे पोस्टर उतरले की दुसऱ्या दिवशी दुसऱ्याचे अधिक मोठे अन् आकर्षक पोस्टर येथे लावले जाते.
राजकमल चौकात वृत्तपत्र व्यावसायिक बसतात. त्याबाजूने नव्याने सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. तेथेही महापालिकेच्या नाकावर टिच्चून मोठमोठे बॅनर आणि होर्डिंग्ज लावले जात असून त्यासाठी मनपाची कोणतीच परवानगी घेतली जात नाही. हे बॅनर्स, पोस्टर्स सत्ताधिशांसह महापालिका आणि अन्य संस्थांमध्ये कार्यरत अधिकारी, राजकीय मंडळींचे असल्याने बाजार परवाना विभागही ते काढण्याचे धाडस करीत नाही. एकट्या राजकमल चौकापुरती ही परिस्थिती नाही. उड्डाणपूल, तर या जाहिरात फलकांनी अक्षरश: व्यापला आहे. शहरातील जयस्तंभ चौक, नमुना, मालविय चौक, चित्रा चौक, सरोज चौक, राजापेठ, बडनेरा मार्ग, बापट चौक, नागपुरी गेट, शेगाव नाका चौक, कठोरा नाका चौकासह शहरातील अनेक चौकांना फलकांनी वेढा घातला आहे. शहरातील उड्डाणपूल असो वा रस्ते दुभाजक. फलकबाजांनी कोणतेच स्थान सोडलेले नाही. यावर महापालिकेचा अंकुश राहिला नसल्याने ही फलकबाजी अमरावतीकरांच्या अंगावर आली आहे
‘ते’ फलक अपघातप्रवण
राजकमल चौकस्थित संकुलाच्या कोपऱ्यावर दररोज मोठमोठी राजकीय फलके राजरोसपणे आणि बेकायदेशिररित्या लावण्यात येतात. सिग्नलवर वाहने थांबली असताना वाहनचालकांचे लक्षही विचलित होते. याशिवाय रस्त्याच्या बाहेर ही फलके डोकावत असल्याने अपघाताची शक्यता संभवते. मात्र, ही जीवघेणी फलके काढून संबंधितांवर कारवाईचा आसूड ओढवला जात नसल्याने राजकीय कार्यकर्त्यांसह आदी फलक लावणारे निरंकुश झाले आहेत.
सौंदर्यीकरणाचे विद्रुपीकरण
सौंदर्यीकरणाचे विद्रुपीकरण केल्यास संबंधितांविरूद्ध फौजदारी कारवाई केली जाते. कोचिंग क्लासधारकांविरूद्ध चार दिवसांपूर्वीच ही कारवाई करण्यात आली. मात्र, राजकमल चौकातील दोन्ही कॉर्नरवर अपघाताला निमंत्रण देणारे फ्लेक्स, बॅनर्स दररोज लावले जात असताना बाजार परवाना विभागाने घेतलेले झोपेचे सोंग संताप आणणारे आहे. उड्डाणपूलासह शहरातील अनेक चौकांमध्ये केलेल्या सौंदर्यीकरणावरही पोस्टर्स चिटकविल्याने तो भाग विद्रुप झाला आहे.