शहर सीसीटीव्हीच्या नजरकैदेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 10:43 PM2018-07-16T22:43:02+5:302018-07-16T22:43:25+5:30
शहरातील गुन्हेविषयक घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी लवरकच सीसीटीव्ही लावण्यात येणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांनीही प्रस्तावाला मान्यता दिल्याने पोलीस विभागाच्या प्रस्तावाला जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) कडून हिरवी झेंडी मिळाली आहे. ९० लाख ९२ हजारांच्या निधीतून शहरातील प्रमुख ठिकाणी तब्बल ३६ सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरातील गुन्हेविषयक घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी लवरकच सीसीटीव्ही लावण्यात येणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांनीही प्रस्तावाला मान्यता दिल्याने पोलीस विभागाच्या प्रस्तावाला जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) कडून हिरवी झेंडी मिळाली आहे. ९० लाख ९२ हजारांच्या निधीतून शहरातील प्रमुख ठिकाणी तब्बल ३६ सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत.
शहरात वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्याच्या उद्देशाने सीसीटीव्ही बसविण्याचा प्रस्ताव तयार केला होता. कायद्याचे उल्लंघन करणारे व गुन्हेगारी रोखण्यासाठी हे सिसीटीव्ही उपयोगी पडणार असून, सीसीटीव्हीची पोलीस तपासात मोठी मदत होणार आहे. त्याअनुषंगाने शहरातील प्रमुख व महत्त्वाच्या चौकांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. राजकमल, जयस्तंभ चौक, राजापेठ, मालवीय चौक, इर्विन चौक, पंचवटी चौक, अशा १४ ठिकाणी ३६ सीसीटीव्ही लावण्याच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली असून, सीसीटीव्ही बसविण्याचा निधीसुध्दा पोलीस विभागाला लवकरच प्राप्त होणार आहे. त्याअनुषंगाने पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी पुढील कार्यवाहीची प्रक्रिया सुरू केली आहे.
पोलीस मुख्यालयात नियंत्रण कक्ष
शहरात सीसीटीव्ही लागल्यानंतर त्याचे नियंत्रण पोलीस मुख्यालयातील नियंत्रण कक्षातून केले जाणार आहे. सीसीटीव्हीत कैद होणाऱ्या प्रत्येक बाबीवर पोलीस मुख्यालयातील पोलीस अधिकारी व कर्मचारी लक्ष ठेवून राहणार आहे. काही घडामोडी आढळून आल्यास त्यावर तत्काळ कार्यवाही करण्यात येणार आहे.