रात्री ११ वाजता शहर बंद; पोलीस आयुक्तांचा निर्णय
By admin | Published: June 9, 2016 12:19 AM2016-06-09T00:19:42+5:302016-06-09T00:19:42+5:30
शहरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी रात्री ११ वाजतानंतर बार, हॉटेल, रेस्टॉरेंट व हातगाड्या बंद करण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्यात.
अमरावती : शहरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी रात्री ११ वाजतानंतर बार, हॉटेल, रेस्टॉरेंट व हातगाड्या बंद करण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्यात. ११ वाजतानंतर हे व्यवसाय सुरु दिसल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. मंगळवारी रात्री पोलीस आयुक्तांनी गाडगेनगर ठाण्याच्या क्षेत्रात पेट्रोलिंग केली. त्यामध्ये एका बिअरबारवर कारवाई करण्यात आली आहे.
शहरातील बहुतांश व्यापारी रात्री १० वाजतापर्यंत व्यापारी प्रतिष्ठाने बंद करतात. मात्र, काही ठिकाणी फुटपाथवर चायनिज, चाटभंडार व अंडीविक्रीच्या हातगाड्या सुरूच असतात. काही ठिकाणी रात्री बार व रेस्टॉरेंट देखील सुरु राहात असल्याचे निदर्शनास येत आहे. रात्रीच्या वेळी गुन्हेगारी प्रवृत्तीचे तत्व सक्रिय असतात. ते गुन्हा करण्यापूर्वी धाबे, बार, हातगाड्या व हॉटेलमध्ये आश्रय घेतात. ही बाब पोलीस आयुक्तांच्या निदर्शनास आली आहे. त्या अनुशंगाने पोलीस आयुक्त मंडलिक यांनी या सूचना दिल्या आहेत. मंगळवारी स्वत: पोलीस आयुक्तांनी गाडगेनगर हद्दीत पेट्रोलिंग केले. त्यांच्यासोबत पोलीस उपायुक्त मोरेश्वर आत्राम व सहायक पोलीस आयुक्त रियाजुद्दीन देशमुख सुध्दा होते. या दरम्यान त्यांनी एका बिअरबारवर कारवाई केली असून तो अहवाल उत्पादन शुल्क विभागाला पाठविण्याच्या सूचना दिल्या आहेत.