‘मिस्ड कॉल सिटिझन फीडबॅक’मध्ये शहर शून्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 10:40 PM2018-01-13T22:40:49+5:302018-01-13T22:41:44+5:30
राज्यातील छोट्या नगरपरिषदा स्वच्छ सर्वेक्षणात अव्वल येण्यासाठी धडपडत आहेत व त्यासाठी व्यापक जनजागृतीवर भर देत असताना अमरावती शहर मात्र त्यात माघारले आहे.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : राज्यातील छोट्या नगरपरिषदा स्वच्छ सर्वेक्षणात अव्वल येण्यासाठी धडपडत आहेत व त्यासाठी व्यापक जनजागृतीवर भर देत असताना अमरावती शहर मात्र त्यात माघारले आहे. १४ हजारांपेक्षा अधिक स्वच्छता अॅप डाऊनलोड करून त्यात समाधान मानणारे अमरावती शहर ‘मिसकॉल सिटिझन फिडबॅक’ या घटकात माघारले आहे. ४ हजार गुणांच्या स्वच्छ सर्वेक्षण २०१८ च्या अनुषंगाने ‘नागरिकांच्या प्रतिक्रिया या घटकासाठी १४०० गुण आहेत. त्यापैकी १०० गुण ‘मिसकॉल सिटिझन फिडबॅक ’वर अवलंबून आहेत. मात्र या आघाडीवर अमरावती शहर व पर्यायाने महापालिका प्रशासनात सामसूम आहे. १९६९ या टोल फ्री क्रमांकावर मिसकॉल देऊन नागरिकांना त्यांच्या प्रतिक्रिया द्यावयाच्या आहेत.
देशातील ४,०४१ शहरांमध्ये ४ जानेवारीपासून स्वच्छ सर्वेक्षण २०१८ या महत्त्वाकांक्षी सर्वेक्षणास सुरुवात झाली आहे. ४ हजार गुणांच्या या परीक्षेत सेवास्तरावरील प्रगती व नागरिकांच्या प्रतिक्रियांसाठी प्रत्येकी १४०० व प्रत्यक्ष निरीक्षणाकरिता १२०० गुण आहेत. स्वच्छ सर्वेक्षणास सामोरे जात असताना शहराच्या गुणांकनाची मदार ‘सिटिझन फिडबॅकवर’ अवलंबून आहे. स्वच्छ सर्वेक्षणादरम्यान क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडियाचे असेसर्स नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊन शहराचे गुणांकन ठरविणार आहेत. त्यासोबतच संबंधित शहरातील नागरिकांनी १९६९ या टोल फ्री क्रमांकावर मिसकॉल देऊन स्वच्छ सर्वेक्षण व शहर स्वच्छतेबाबत त्यांचे मत द्यावयाचे आहेत. त्यात अमरावती शहरातील नागरिकांनी अद्यापपर्र्यंत कुठलीही प्रतिक्रिया नोंदविलेली नाही. स्वच्छ सर्वेक्षणात नागरिकांचाही सहभाग वाढावा, तसेच नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटावे, या हेतूने १९६९ हा टोल फ्री क्रमांक सुत्रू करण्यात आला आहे. या क्रमांकावर मिसकॉल देऊन, शिवाय संकेतस्थळाच्या माध्यमातून नागरिकांना त्यांचे मत नोंदविणे शक्य आहे. १९६९ या टोल फ्री क्रममांकावर कॉल केला असता लवकरच आपले मत नोंदवून घेतले जाईल, असा संदेश दिला जातो. त्यानंतर ५ ते १० मिनिटांमध्ये मिसकॉल देणाºयाच्या भ्रमणध्वनीवर परत कॉल येऊन सहा प्रश्न विचारले जातात. स्वच्छ भारत अभियानाच्या अनुषंगाने घेण्यात येत असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेचा मिसकॉल सिटिझन फिडबॅक हा एक घटक आहे. शनिवारी अमरावती शहराचा या घटकाअंतर्गत असलेल्या बाबीमध्ये कुठलाही उल्लेख नव्हता. त्यामुळे क्युसीआयचे पथक स्वच्छ सर्वेक्षणासाठी शहरात येण्यापूर्वी अमरावती शहराला ‘मिसकॉल सिटिझन फिडबॅक’मध्ये स्थान नोंदवून संधीचे सोने करण्याची संधी आहे.
स्वच्छता अॅपमध्ये ३५ वे रँकिंग
स्वच्छता अॅप डाऊनलोड करून त्यावर आलेल्या समस्यांचे निराकरण या घटकांमध्ये अमरावती शहर ३५ व्या क्रमांकावर आहे. १ ते १० लाख लोकसंख्येच्या ३६९ शहरांमधील हे स्थान आहे. अमरावती महापालिकेने आतापर्यंत १४,३९४ स्वच्छता अॅप डाऊनलोड करण्यात यश मिळविले आहे. पालिकेला २०११ च्या लोकसंख्येच्या तुलनेत १३ हजार अॅप डाऊनलोड करण्याचे उद्दिष्ट होते. ते लक्ष्य महापालिकेने पूर्ण केले आहे. आता १९६९ या टोल फ्री क्रमांकावर मिसकॉल देऊन प्रतिक्रिया नोंदविण्याचा रतिब घातल्यास गुणांकनात भर पडणार आहे.