‘नंबर गेम’मधून शहर बाद; केवळ रँकिंगची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 01:20 AM2018-05-18T01:20:29+5:302018-05-18T01:20:29+5:30
बहुप्रतीक्षित स्वच्छ सर्वेक्षण २०१८ चा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र देशात स्वच्छतेच्या कामगिरीत दुसऱ्या क्रमांकाचे राज्य ठरले. तथापि, राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारप्राप्त शहरांच्या ‘नंबर गेम’मध्ये शहराचा समावेश नसल्याने अमरावतीकरांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : बहुप्रतीक्षित स्वच्छ सर्वेक्षण २०१८ चा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र देशात स्वच्छतेच्या कामगिरीत दुसऱ्या क्रमांकाचे राज्य ठरले. तथापि, राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारप्राप्त शहरांच्या ‘नंबर गेम’मध्ये शहराचा समावेश नसल्याने अमरावतीकरांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाला आता केवळ स्वच्छता रँकिंगची प्रतिक्षा लागून राहिली आहे.
जानेवारी ते मार्च २०१८ या कालावधीत स्वच्छ सर्वेक्षण २०१८ घेण्यात आले होते. ४ हजार गुणांच्या या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेचा निकाल बुधवारी घोषित करण्यात आला. त्यातील विविध राष्ट्रीय तथा राज्यपातळीवरील ‘स्वच्छ’ पुरस्कारात अमरावतीचा टिकाव लागलेला नाही. त्यामुळे स्पर्धेत असलेली एकूण ४०४१ शहरे व त्यातील ५०० अमृत शहरांच्या तुलनेत अमरावती शहराचे स्वच्छता रॅकिंग नेमके किती? याबाबत जाणून घेण्याची औपचारिकताच तेवढी शिल्लक आहे. पुरस्कारप्राप्त शहरांच्या यादीत कुठल्याही ‘कॅटेगरी’त नाव नसल्याने गतवर्षीच्या २३३ व्या क्रमांकावरुन शहर पुढे सरकते की पहिल्या शंभर क्रमांकात येते, याकडे प्रशासनाचे लक्ष लागले आहे. दरम्यान शहराचे मानांकन जाणून घेण्याची उत्सूकता लागलेल्या महापालिका आयुक्त हेमंत पवार यांनी बुधवारी नगरविकास विभागासह स्वच्छ भारत मिशनशी संपर्क साधून अमरावतीच्या निकालाबाबत विचारणा केली. मात्र बुधवारी निवडक पुरस्कार घोषित करण्यात आले असून संपुर्ण देशातील ४०४१ शहरांचे स्वच्छता रॅकिंग पारितोषिक वितरणावेळी घोषित करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षणात शहर कोणत्या क्रमांकावर ही उत्सुकता गुरुवारपर्यंत शमू शकली नव्हती. केंद्रिय गृहनिर्माण व शहरी विकास राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी नवी दिल्ली येथे स्वच्छ सर्वेक्षण २०१८ चा निकाल जाहीर केला. इंदूर हे सलग दुसºया वर्षी देशातील पहिल्या क्रमांकाचे ‘स्वच्छ’ शहर ठरले. तर भोपाळ व चंदीगढ या शहरांनी अनक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकाविला. नागपूर स्वच्छ सर्वेक्षणात देशातील नाविन्यपूर्ण व उत्कृष्ट कार्यशैली असणारे शहर ठरले आहे, तर नवी मुंबई शहर घनकचरा व्यवस्थापनात देशात सर्वोत्तम ठरले आहे. परभणी शहर नागरिकांच्या प्रतिसादात उत्कृष्ट ठरले आहे, तर भिवंडी शहरास गतिमान मध्यम शहर हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. बृहन्मुंबई शहरास सर्वोत्कृष्ट राजधानीचे स्वच्छ शहर असा पुरस्कार जाहीर झाला आहे.