एलबीटी वसुलीसाठी ‘सिटीलॅन्ड’ ‘बिझिलॅन्ड’ लक्ष्य
By Admin | Published: March 26, 2015 12:03 AM2015-03-26T00:03:52+5:302015-03-26T00:03:52+5:30
स्थानिक संस्था कर (एलबीटी) वसुलीसाठी महापालिका सीमेबाहेरील ‘सिटीलॅन्ड’ आणि ‘बिझिलॅन्ड’ या संकुलांना लक्ष्य करण्यात आले आहे.
अमरावती : स्थानिक संस्था कर (एलबीटी) वसुलीसाठी महापालिका सीमेबाहेरील ‘सिटीलॅन्ड’ आणि ‘बिझिलॅन्ड’ या संकुलांना लक्ष्य करण्यात आले आहे. याच श्रृंखलेत बुधवारी नागपूर महामार्र्गावरील बोरगाव स्थित ‘सिटीलॅन्ड’ नामक संकुलातील गणेश होजीअरी या रेडिमेड कापड दुकानाला टाळे लावण्याची कारवाई करण्यात आली.
महापालिकेत १ जुलै २०१२ पासून एलबीटी सुरु करण्यात आला. मात्र एलबीटीतून सुटका मिळावी, यासाठी व्यापाऱ्यांनी महापालिका सीमेबाहेर प्रतिष्ठाने थाटली आहेत. नागपूर महामार्गावर ‘सिटीलॅन्ड’ आणि ‘बिझिलॅन्ड’ संकुल साकारले आहे. कापड व्यवसायाशी निगडित व्यापाऱ्यांनी एलबीटी वाचविण्यासाठी शहरातील दुकाने सीमेबाहेर नेलीत. परंतु एलबीटीचा भरणा करण्यास व्यापाऱ्यांनी पुढाकार घेतला नाही. नोंदणी अथवा कर न भरता दुकाने बाहेर नेली. त्यामुळे दुकानांची यादी ही एलबीटी विभागात कायम आहे. दरम्यान कर मूल्यांकन सुरु झाले असता बऱ्याच दुकानांवर एलबीटी थकीत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे एलबीटी विभागाने प्रतिष्ठानच्या संचालकांना २०१२ ते २०१४ या आर्थिक वर्षांचे कर मूल्याकंनासाठी वारंवार नोटीस बजावल्यात. परंतु व्यावसायिकांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे बोरगाव स्थित गणेश होजीअरी या दुकानाला टाळे लावण्याची कारवाई करण्यात आली. ही कारवाई उपायुक्त विनायक औगड यांच्या मार्गदर्शनात सहायक आयुक्त योगेश पिठे, एलबीटी अधीक्षक सुनील पकडे यांनी केली आहे. मार्च अखेरपर्यत एलबीटी वसुलीसाठी व्यापारी संकुलावर छापे टाकून एलबीटी बुडविणाऱ्याना टाळे लावण्याची कारवाई सुरुच राहील. एलबीटीचा भरणा करुन व्यापाऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त अरुण डोंगरे यांनी केले आहे.