भानखेडा मार्गावर चार बिबट असल्याचा दावा
By Admin | Published: January 23, 2015 12:45 AM2015-01-23T00:45:46+5:302015-01-23T00:45:46+5:30
शिकारीच्या शोधात वन्यप्राणी शहराच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे चित्र आहे. भानखेडा मार्गावर एक-दोन नव्हे तर चक्क चार बिबट असल्याचा दावा वनविभागाने केला आहे.
अमरावती : शिकारीच्या शोधात वन्यप्राणी शहराच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे चित्र आहे. भानखेडा मार्गावर एक-दोन नव्हे तर चक्क चार बिबट असल्याचा दावा वनविभागाने केला आहे. यातील दोन बिबट वन विभागाच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. जंगलात जाताना नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन वनविभागामार्फत करण्यात आले आहे.
वडाळी वनपरिक्षेत्रांतर्गत बिबट, हरिण, निलगाय, रानडुक्कर अशा विविध वन्यप्राण्यांचा संचार आहे. विशेषत: भानखेडा मार्गावर चार बिबट्यांचा मुक्तसंचार असल्याचे नागरिकांनी बघितले आहे. बिबट शिकारीच्या शोधात शहराच्या दिशेने वाटचाल करीत आहे. दोन दिवसांपूर्वी भानखेडा मार्गावर म्हशीची शिकार करून तिला नजीकच्या शेतात नेऊन फस्त केल्याचे दृष्य वनविभागाच्या कॅमेऱ्यात कैद झाले. म्हशीचे उर्वरित मांस भक्षण्याकरिता दोन बिबट घटनास्थळी पोहोचल्याचे गुरूवारी ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाले. वडाळी वनपरिक्षेत्रात चार ते पाच बिबट असल्याची नोंद यापूर्वीच झाली आहे. मोकाट कुत्र्यांची शिकार करण्यासाठी बिबट शहराकडे येत असल्याचा दावा वन अधिकाऱ्यांनी केला आहे. यातील एक बिबट काही दिवसांपूर्वी विद्यापीठ ते रहाटगाव परिसरातही आढळून आला. वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी विशेष पथक तयार केले आहे. चांदूररेल्वे, भानखेडा मार्गावर या बिबट्यांचा मुक्तसंचार असून नागरिकांनी जंगलात प्रवेश करताना सावधगिरी बाळगावी असे आवाहन वडाळीचे वनपरिक्षेत्र अधिकारी पी. के. लाकडे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)