नवआयुक्तांकडून आज विभागप्रमुखांचा ‘क्लास’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 10:47 PM2018-06-17T22:47:12+5:302018-06-17T22:47:31+5:30
महापालिकेचे नवे आयुक्त संजय निपाणे हे सोमवार, १८ जूनला विभागप्रमुखांचा क्लास घेणार आहेत. प्रत्येक विभागप्रमुखाला प्रत्येकी दोन तासांचा कालावधी मिळणार असून, त्यात आयुक्त त्या - त्या विभागातील समस्या व वर्तमान स्थिती जाणून घेणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महापालिकेचे नवे आयुक्त संजय निपाणे हे सोमवार, १८ जूनला विभागप्रमुखांचा क्लास घेणार आहेत. प्रत्येक विभागप्रमुखाला प्रत्येकी दोन तासांचा कालावधी मिळणार असून, त्यात आयुक्त त्या - त्या विभागातील समस्या व वर्तमान स्थिती जाणून घेणार आहेत.
बुधवारी मध्यान्हानंतर पद्भार सांभाळल्यानंतर संजय निपाणे दोन दिवसांच्या रजेवर गेले. ते सोमवारी पुन्हा रूजू होतील. बुधवारीच त्यांनी सोमवारच्या आढावा बैठकीची सूचना विभागप्रमुख व अधिकाऱ्यांना केली होती. ‘एचओडी’ बैठक झाल्यानंतर सायंकाळी ६ च्या सुमारास त्यांनी दोन्ही प्रभारी उपायुक्तांकडून कळीचे मुद्दे जाणून घेतले. त्यानंतर सोमवार, १८ जूनला विभागनिहाय आढावा घेण्याचे निश्चित केले. त्यानुसार आरोग्य, बांधकाम, स्वच्छता, सामान्य प्रशासन, बाजार परवाना, पाणीपुरवठा, कार्यकारी अभियंता १ व २ अतिक्रमण, भांडार, पशुशल्य, अभिलेखागार, एडीटीपी, लेखा परीक्षण या महत्त्वपूर्ण विभागांचा आढावा घेतला जाणार आहे.
२० जूनला होऊ घातलेल्या आमसभेच्या विषयपत्रिकेतील मुद्यांवरही आयुक्त जाणून घेतील. याशिवाय महत्त्वपूर्ण विभागास येणारा निधी, निधीचा विनियोग, सुरू असलेले प्रकल्प, पाईपलाईनमध्ये असलेले प्रकल्प, मंत्रालयस्तरावर प्रलंबित असलेल्या प्रकल्पांसह विभाग प्रमुखांसमोर अडचणींचाही उहापोह सोमवारच्या मॅराथॉन बैठकीत होईल. त्या अनुषंगाने प्रत्येक विभागप्रमुख कामाला लागला असून ‘साहेबां’समोर आपण कमी पडू नये, यासाठी पूर्वतयारीने वेग घेतला आहे.
स्वभावशैलीचा कानोसा
महापालिकेने गुडेवारांचा १३ महिन्यांचा वादळी काळ अनुभवला. पवारांचे मवाळ धोरणाचेही ते साक्षीदार ठरले. त्या पार्श्वभूमिवर नव्या आयुक्तांच्या स्वभावशैलीचा कानोसा घेतला जात आहे. साहेब चेहºयावरून कडक दिसतात. काम करवून घेण्याचीही त्यांची मानसिकता दिसून येत असल्याची चर्चा अधिकारी-कर्मचाºयांमध्ये झडू लागली आहे.