पालकमंत्र्यांनी घेतला अधिकाऱ्यांचा क्लास
By admin | Published: January 12, 2015 10:43 PM2015-01-12T22:43:53+5:302015-01-12T22:43:53+5:30
पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी तहसील कार्यालयाच्या सभागृहात मोर्शी व वरुड तालुक्याची संयुक्त आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. शेतकऱ्यांना कुठल्याही
वरूड : पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी तहसील कार्यालयाच्या सभागृहात मोर्शी व वरुड तालुक्याची संयुक्त आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. शेतकऱ्यांना कुठल्याही परिस्थितीत त्रास होता कामा नये, झाल्यास अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, अशी तंबीच त्यांनी अधिकाऱ्यांना दिली.
शेतकरी आहे म्हणून आपण आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांबाबतची सर्व माहिती अद्ययावत असली पाहिजे असेही त्यांनी आवर्जून सांगितले. सिंचन प्रकल्प, कृषी योजना, नगरपरिषदांना मिळणाऱ्या निधीचे नियोजन, तालुक्यातील सुविधा आणि शेतकऱ्यांवर सतत येणाऱ्या संकटांचे निवारण करण्याकरिता नेहमी अधिकाऱ्यांनी सतर्क असले पाहिजे. त्यांच्या काय अडचणी आहेत, त्या मला थेट सांगा, असे म्हणत याकरिता स्वत:चा भ्रमणध्वनी क्रमांकसुध्दा पालकमंत्र्यांनी दिला. प्रत्येक तलाठी, ग्रामसेवक तसेच अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहणे अनिवार्य आहे, अपडाऊनमध्ये नागरिकांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेण्यास त्यांनी सांगितले.
महसूल, पाटबंधारे, नगरपरिषद, कृषी, वनविभाग, लघुसिंचन विभाग, पोलीस आदी विभागाचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते. दर महिन्याला आढावा बैठक घेऊन जनतेच्या समस्या ते जाणून घेणार आहेत. यामुळे जिल्ह्यात तसेच तालुक्याच्या विकासाबाबत नेहमीच सकारात्मक राहून शेतकरी, शेतमजूर तसेच सामान्य नागरिकांना न्याय देता येईल, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करता येणार नाही. जेथे ट्रान्सफार्मर जळाले तेथे दोन दिवसांत ट्रान्सफार्मर बसवा, अन्यथा कारवाईस पुढे जा, असेही वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना त्यांनी ठणकावले. कागदोपत्री कामे न ठेवता ते प्रत्यक्ष व्हायला पाहिजे, असे ते म्हणाले.
अधिकाऱ्यांनी अपूर्ण माहिती आणल्याने त्यांची तारांबळ उडाली होती. सर्व प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचेही आदेश त्यांनी दिले. आरोग्य विभागाची रुग्णवाहिका सज्ज ठेवणे तसेच ग्रामीण रुग्णालयात ५० खाटांची सोय करून अत्यावश्यक सुविधा दिली जावी. यावेळी वरूडचे मुख्याधिकारी आणि तहसीलदारांना त्यांनी धारेवर धारले. बैठकीला प्रवीण पोटे, आ. अनिल बोंडे, उपविभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजा रामास्वामी, नगराध्यक्ष रवींद्र थोरात उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)