इयत्ता सातवी, नववीचा अभ्यासक्रम बदलणार
By admin | Published: April 6, 2017 12:07 AM2017-04-06T00:07:03+5:302017-04-06T00:07:03+5:30
कृतीशील व उपाययोजनात्मक (अप्लिकेशन बेस) अभ्यासक्रमातून पुढील पिढी घडावी, ...
निर्णय : येत्या शैक्षणिक सत्रापासून अंमलबजावणी
अमरावती : कृतीशील व उपाययोजनात्मक (अप्लिकेशन बेस) अभ्यासक्रमातून पुढील पिढी घडावी, यासाठी नव्या शैक्षणिक सत्रापासून इयत्ता ७ वी व ९ वीचा अभ्यासक्रम बदलविण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने शालेय शिक्षण विभागाने जोरदार तयारी चालविली असून हा अभ्यासक्रम अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहिती आहे.
सध्या शाळांमध्ये परीक्षांचा हंगाम सुरू आहे. उन्हाळी सुट्या लागण्यास अवकाश असला तरी सन २०१७-१८ म्हणजे आगामी सत्रापासून इयत्ता ७ वी व ९ वीचा अभ्यासक्रम बदलणार आहे. सन २०१८-१९ या वर्षांमध्ये इयत्ता नववी व दहावीच्या अभ्यासक्रमातही बदल होण्याचे संकेत आहेत. नव्या अभ्यासक्रमात ‘आयसीटी’ विषयांचा अंतर्भाव असेल. सरत्या शैक्षणिक वर्षात परीक्षांची धामधूम असली तरी शैक्षणिक जगतात अभ्यासक्रम बदलाचे वारे वाहू लागले आहेत.इयत्ता सातवी व नववीच्या सुधारित अभ्यासक्रमात येत्या शैक्षणिक सत्रापासून मोठा बदल दिसेल. अभ्यासक्रमातील बदलाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून विविध विषयांचे तज्ज्ञ त्यासाठी नेमण्यात आले आहेत. इयत्ता सातवी व नववीच्या नव्या अभ्यासक्रमाची रूपरेषा तयार करण्यात आली असून पुस्तकांच्या समीक्षणाचे काम पूर्णत्वाकडे जात आहे. इयत्ता सातवी व नववीचा अभ्यासक्रम ‘ज्ञानरचनावादा’वर आधारित असल्याने विद्यार्थ्यांना कृतीशील अभ्यासक्रम शिकविला जाईल. नव्या अभ्यासक्रमात एखादा विषय समजावून सांगायचा असेल तर तो कृतीतून सांगवा लागणार आहे.