स्वच्छ नगर पालिका, पंचायतींवर ‘धनवर्षाव’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 10:16 PM2018-11-11T22:16:49+5:302018-11-11T22:17:50+5:30
स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत हागणदरीमुक्त झालेल्या जिल्ह्यातील १३ नगर पालिका-नगर पंचायतींना राज्य शासनाने ४.५० कोटी रुपयांचा निधी दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत हागणदरीमुक्त झालेल्या जिल्ह्यातील १३ नगर पालिका-नगर पंचायतींना राज्य शासनाने ४.५० कोटी रुपयांचा निधी दिला आहे.
हागणदरीमुक्त शहरे अभियानांतर्गत उत्तम काम करणाऱ्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रत्येकी दोन, दीड व एक कोटी रुपये प्रोत्साहनात्मक अनुदान देण्याचा निर्णय राज्यस्तरावर घेण्यात आला. त्याअनुषंगाने भातकुली व धारणी या दोन नगर पंचायतींना पहिल्या टप्प्यातील प्रत्येकी ३० लाख रुपये प्राप्त होणार आहेत, तर उर्वरित ११ नगरपरिषदा व नगर पंचायतींना ३.९० कोटी रुपये दुसरा हप्ता वितरित करण्यास नगरविकास खात्याने मान्यता दिली आहे.
स्वच्छ महाराष्टÑ अभियानाच्या अंमलबजावणीपासून आतापर्यत हागणदारीमुक्त झालेल्या शहरांपैकी केंद्रशासनाच्या क्यूसीआय या त्रयस्थ संस्थेमार्फत करण्यात आलेल्या तपासणीमध्ये जी शहरे हगणदरीमुक्त झाल्याचे दिसून आली आहेत, अशा शहरांना अनुज्ञेय प्रोत्साहन अनुदान रकमेच्या ३० टक्के निधीचा पहिला हप्ता देण्यात येतो.
ज्या शहरांना अनुदान रकमेचा पहिला हप्ता वितरति करण्यात आला होता व ज्या शहरांची केंद्र शासनाच्या क्यूसीआय या त्रयस्थ संस्थेमार्फत पुनर्तपासणी करण्यात आली, या पुनर्तपासणीत जी शहरे हगणदरीमुक्त आढळून आलीत, अशा शहरांना प्रोत्साहनपर अनुदान रकमेचा ३० टक्के निधीचा दुसरा हप्ता वितरित केला जातो.
भातकुली, धारणीला प्रत्येकी ३० लाख
स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत हागणदरीमुक्त झालेल्या भातकुली व धारणी या दोन नगर पंचायतींना प्रत्येकी एक कोटी रुपये प्रोत्साहनपर अनुदान देय असून, त्यापैकी प्रत्येकी ३० लाख रुपये त्यांना वितरित करण्यात आले आहेत. ३० टक्के रकमेचा हा पहिला हप्ता आहे.