स्वच्छ सर्वेक्षणमध्ये शहर १२२ व्या स्थानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 10:17 PM2018-06-23T22:17:02+5:302018-06-23T22:17:21+5:30
देशभरातील ४,२०३ शहरांना उत्सुकता लागून राहिलेल्या बहुप्रतिक्षित ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१८’ चे शहरनिहाय मानांकन शनिवारी घोषित करण्यात आले. या सर्व शहरांची अमृत आणि नॉन अमृत अशी वर्गवारी करण्यात आली होती. त्यात अमृत शहराच्या ‘नॅशनल रँकिंग’मध्ये अमरावतीला १२२ वे स्वच्छ शहर म्हणून मानांकन मिळाले. शहराला ४ हजारांपैकी २४८६.५४ गुण मिळाले.तर राज्यातील ४३ शहरांमध्ये अमरावतीचे मानांकन ३४ असे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : देशभरातील ४,२०३ शहरांना उत्सुकता लागून राहिलेल्या बहुप्रतिक्षित ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१८’ चे शहरनिहाय मानांकन शनिवारी घोषित करण्यात आले. या सर्व शहरांची अमृत आणि नॉन अमृत अशी वर्गवारी करण्यात आली होती. त्यात अमृत शहराच्या ‘नॅशनल रँकिंग’मध्ये अमरावतीला १२२ वे स्वच्छ शहर म्हणून मानांकन मिळाले. शहराला ४ हजारांपैकी २४८६.५४ गुण मिळाले.तर राज्यातील ४३ शहरांमध्ये अमरावतीचे मानांकन ३४ असे आहे.
सन २०१७ मध्ये ४३४ शहरांमध्येच स्वच्छ सर्वेक्षण घेण्यात आले होते.
निकालाने उत्सुकता शमली
मात्र २०१८ मध्ये ती संख्या ४२०३ शहरांवर पोहोचली. एकूण ४ हजार गुणांचे हे सर्वेक्षण होते. विशेष म्हणजे गतवर्षी अमरावती शहर स्वच्छ शहरांच्या यादीत २३१ व्या क्रमांकावर होते. मागील महिन्यात देशपातळीवरील पहिल्या ५० स्वच्छ शहरांची यादी घोषित करण्यात आली. त्यापासूनच आपले शहर स्वच्छ सर्वेक्षणात कुठे आहे, ही उत्सुकता प्रशासनासह सर्वसामान्यांनाही लागली होती. ती उत्सुकता शनिवारच्या निकालाने शमली. विशेष म्हणजे ४८५ अमृत शहरांच्या यादीत अमरावती शहराला १२२ वे तर अचलपूर शहराला ४८ वे मानांकन मिळाले. अचलपूरने अमरावतीपेक्षा अधिक अर्थात २९०२.९ गुण मिळविले.
४ हजार गुणांपैकी प्रत्येकी १४०० गुण नागरिकांच्या प्रतिक्रिया व सेवास्तरावरील प्रगतीसाठी तर प्रत्यक्ष निरीक्षणाकरिता १२०० गुण होते. केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाच्या अखत्यारितील क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडियाच्या असेसर्सनी १५ ते २१ फेब्रुवारीदरम्यान शहराचे स्वच्छताविषयक सर्वेक्षण केले. त्यांनी सुकळी कंपोस्ट डेपोसह इतवाऱ्याचा वेस्ट आर्गेनिक प्रकल्प व मलशुद्धीकरण प्रकल्पासह अन्य प्रकल्पांचे निरीक्षण करून नागरिकांच्या प्रतिक्रिया प्रत्यक्ष जाणून घेतल्या. त्यानंतर राष्ट्रीय स्तरावर गुणांकन करण्यात आले.
असे मिळाले गुण
सेवास्तरावरील प्रगतीसाठी असलेल्या एकूण १४०० गुणांपैकी अमरावती शहराला ४१७ गुण मिळालेत, तर प्रत्यक्ष निरीक्षणासाठी असलेल्या १२०० गुणांपैकी ९६२.७७ गुण मिळाले. तसेच १४०० गुणांच्या नागरिकांच्या प्रतिक्रियांमध्ये शहराने ११०६.७७ गुण मिळविले. एकूणच ४ हजार गुणांपैकी अमरावती शहराला २,४८६.५४ गुण मिळाले आहेत. शहर सेवास्तरावरील गुणांकनामध्ये माघारल्याने अमरावतीला १२२ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.