‘त्या’ अटीने स्वच्छता कार्पोरेशन गारद !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 10:49 PM2018-02-27T22:49:52+5:302018-02-27T22:49:52+5:30
दैनंदिन स्वच्छतेचे १५० कोटींचे कंत्राट घेण्यास इच्छुक असलेल्या बंगळुरुच्या स्वच्छता कार्पोरेशन या कंपनीची निविदा ‘टेक्निकल बिड’मध्ये अपात्र ठरणार असल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : दैनंदिन स्वच्छतेचे १५० कोटींचे कंत्राट घेण्यास इच्छुक असलेल्या बंगळुरुच्या स्वच्छता कार्पोरेशन या कंपनीची निविदा ‘टेक्निकल बिड’मध्ये अपात्र ठरणार असल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. निविदा प्रपत्रातील ३४ क्रमांकांची अट या कंपनीसाठी घातक ठरणार आहे. ज्या कंपनीने स्वत:हूनही एखादा कंत्राट सोडला असेल अथवा स्वत:हून माघार घेतली असेल, अशी कंपनी या निविदाप्रक्रियेत सहभागी होण्यास पात्र ठरणार नाही, अशी अट या कंत्राटाच्या निविदा प्रपत्रात अंतर्भूत आहे. आपण स्वत:हून नागपूर महापालिकेतील काम सोडल्याचा दावा स्वच्छता कार्पोरेशनने केला आहे. तो दावा खरा मानल्यास ३४ व्या क्रमांकाच्या अटीशी अधीन राहूनही ती कंपनी या निविदाप्रक्रियेत सहभागीच होऊ शकत नाही. ही कंपनी नागपूर महापालिकेत रोड स्विपिंगचे काम पूर्ण करू शकली नाही. त्यामुळे या कंपनीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहेत. उलटपक्षी महापालिकेला १८ जानेवारी २०१७ रोजी पाठविलेल्या पत्रात स्वच्छता कार्पोरेशनने त्यांचा करार नागपूर महापालिकेने ‘डिस्कंटिन्यू’ केल्याची कबुली दिली. त्या पार्श्वभूमीवर सुमीत फॅसिलिटी पाठोपाठ स्वच्छता कार्पोरेशनची निविदा तांत्रिकतेतच गारद होणार आहे. हाच मुद्दा केंद्रस्थानी ठेवून मुख्य लेखापरीक्षकांनी निविदा प्रपत्रासह स्वच्छता कार्पोरेशनने महापालिकेस पाठविलेल्या पत्राचा अभ्यास चालविला आहे. नागपूर महापालिकेने करार रद्द केल्याची कबुली स्वच्छताने दिली असताना, नागपूर महापालिकेने मात्र अमरावती महापालिकेला तसे स्वयंस्पष्ट कळविलेले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा नागपूर महापालिकेशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. एखाद्या कंपनीचा करार शासकीय वा निमशासकीय संस्थेने रद्द केलेल्या असल्यास ती स्वच्छता कंत्राटात ‘कॉम्पिट’ करू शकणार नाही, अशी अट असल्याने तांत्रिक बिडमध्येच स्वच्छता कार्पोरेशन अपात्र ठरणार आहे. दरम्यान, मुख्य लेखापरीक्षकांचा अभिप्राय बुधवारी अपेक्षित आहे.
अशी आहे अट
दैनंदिन स्वच्छता कंत्राटाची निविदाप्रक्रिया करताना स्वच्छता विभागाने त्यासोबत अटी-शर्तींचा दस्तावेज जोडलेला आहे. त्यातील ‘प्री-क्वालिफिकेशन’मध्ये ४२ मुद्द्यांचा समावेश आहे. यातील ३४ व्या क्रमांकाची अट ही कोणती कंपनी या निविदा प्रक्रियेत सहभागी होऊ शकणार नाही, हे स्पष्ट करणारी आहे. जिला शासकीय वा निमशासकीय संस्थेने वगळले ( एक्स्क्लूड) असेल, बॅनिश अर्थात बंदी घातली असेल आणि नाकारले ( रेप्युडाइट ) असेल, ती कंपनी निविदेत सहभागी होण्यास अपात्र ठरेल. स्वच्छता कार्पोरेशनला नागपूर महापालिकेने नाकारल्याची कबुली त्यांनी स्वत:च दिली.
म्हणून पुन्हा पत्रव्यवहार
एकीकडे नागपूर महापालिकेने कंत्राट रद्द केल्याचे स्वच्छता कार्पोरेशनने लेखी कबूल केले आहे. मात्र, त्याबाबत नागपूर महापालिकेने अमरावती महापालिकेला पाठविलेल्या पत्रात ही वस्तुस्थिती नमूद केली नाही. त्यामुळे स्वच्छता कार्पोरेशनच्या कंत्राट रद्दबद्दलची खातरजमा करण्यासाठी पुन्हा एकदा नागपूर महापालिका आयुक्तांशी पत्रव्यवहार केला आहे. अमरावती पालिकेला असेच महत्त्वाचे कंत्राट द्यायचे असल्याने आणि त्यात स्वच्छता कार्पोरेशन ही एकच कंपनी असल्याने आपला अभिप्राय अत्यंत महत्त्वाचा असल्याचे नागपूर महापालिकेला पाठविलेल्या पत्रात प्रशासनाने म्हटले आहे.