गाडगेबाबांच्या पुतळ्याची स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 11:37 PM2017-12-20T23:37:08+5:302017-12-20T23:37:17+5:30
शेंडगावला पुण्यतिथी : अधिकारी, पदाधिकाऱ्यांची धाव
संदीप मानकर।
आॅनलाईन लोकमत
अमरावती : संत गाडगेबाबांच्या कार्याचे विस्मरण झाल्याने शेंडगाव येथील पुतळा परिसर गाजरगवताने वेढला होता. ‘लोकमत’चे याबाबत वृत्त प्रकाशित होताच खासपूर ग्रामपंचायतीने मजूर लावून संत गाडगेबाबा यांच्या पुतळा परिसराची स्वच्छता केली. याशिवाय शासकीय अधिकारी, राजकीय पदाधिकारी यांनी शेंडगावात धाव घेऊन पुण्यतिथीनिमित्त संत गाडगेबांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण केली.
शासनाचे प्रतिनिधी म्हणून अंजनगावचे तहसीलदार या ठिकाणी सकाळीच दाखल झाले. त्यांनी परिसर कायम स्वच्छ राखण्याचे आदेश ग्रामसेवकाला दिले. ग्रामपंचायतीने मजूर लावून पुतळ्यानजीक वाढलेले गाजरगवत कापून घेतले व परिसर स्वच्छ केला. या कामात गावातील काही तरुणांनाही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. याप्रसंगी जि.प. सदस्य विजय काळमेघ, आ. रमेश बुंदिले यांच्या पत्नी मीना बुंदिले, पं.स. सभापती प्रियंका दाळू, सदस्य नितीन पटेल, शेंडगावचे सरपंच खंडारे, अर्चना पखान, नंदू काळे, केशवराव काळमेघ केशव कळमकर, राहुल सहारेंसह अनेक पदाधिकारी व गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी उपस्थित होऊन गाडगेबाबांची पुण्यतिथी केली.
राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी भेट दिलेल्या संत गाडगेबाबांच्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीड वर्षांपूर्वी केले.
तहसीलदारांची भेट
अंजनगावचे तहसीलदार पुरूषोत्तम भुसारी व गटविकास अधिकारी भास्कर रेंगळे यांनी शेंडगाव येथे भेट देऊन परिसराची पाहणी केली व पुतळ्याला हार्रापण करून संत गाडगेबाबांना अभिवादन केले.
ग्रामपंचायतीने काही तरुणांना हाताशी घेऊन पुतळ्याजवळील स्वच्छता केली आहे. हा परिसर नेहमी स्वच्छ ठेवण्याचे आदेश ग्रामसेवकाला दिले आहेत.
-पुरुषोत्तम भुसारी, तहसीलदार