विद्यापीठात स्वच्छतेचा जागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 10:59 PM2017-12-01T22:59:19+5:302017-12-01T22:59:38+5:30
कर्मयोगी संत गाडगेबाबांची कर्मभूमी अमरावती असल्याने आपण सर्व सुशिक्षित झालेल्या युवा पिढीने गाडगेबाबांनी दिलेला स्वच्छतेचा वारसा समृद्धपणे चालविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन अभिनेते तथा स्वच्छतादूत भारत गणेशपुरे यांनी केले.
लोकमत आॅनलाईन
अमरावती : कर्मयोगी संत गाडगेबाबांची कर्मभूमी अमरावती असल्याने आपण सर्व सुशिक्षित झालेल्या युवा पिढीने गाडगेबाबांनी दिलेला स्वच्छतेचा वारसा समृद्धपणे चालविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन अभिनेते तथा स्वच्छतादूत भारत गणेशपुरे यांनी केले.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ विद्यार्थी भवनात राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि अमरावती महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वच्छ भारत-स्वस्थ भारत’ अभियानातंर्गत चर्चासत्राप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कुलगुरु मुरलीधर चांदेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून कुलसचिव अजय देशमुख, स्थायी समितीचे सभापती तुषार भारतीय, अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे, उपायुक्त नरेंद्र वानखडे, आरोग्य अधिकारी सीमा नेताम, रासेयोचे प्रभारी संचालक राजेश मिरगे उपस्थित होते.
गणेशपुरे पुढे म्हणाले, गाडगेबाबांच्या नावे असलेल्या संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता दूत म्हणून समाजात कार्य करण्याची आज गरज असून स्वच्छतेची सुरुवात आपण सर्वांनी आपल्यापासूनच केल्यास येणाºया काळात स्वच्छ आणि स्वस्थ अमरावती शहराची संकल्पना आपण साकार करु शकू. समाजात नवे काही तरी करण्याची क्षमता फक्त तरुणांमध्येच असून त्यासाठी तुमच्यातील शक्तीचा योग्य उपयोग समाजासाठी करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरु मुरलीधर चांदेकर म्हणाले, आपल्यावर जन्माला आल्यापासूनच मातेकडून स्वच्छतेचे संस्कार होत असतात. मात्र, तरीही स्वच्छतेची शिकवण देण्याची वेळ आपल्यावर आली आहे. प्रत्येकाने स्वत: संकल्प केल्यास संपूर्ण भारत स्वच्छ व्हायला वेळ लागणार नाही. कुलसचिव अजय देशमुख यांनी सुद्धा अस्वच्छतेचा असूर घालविण्यासाठी शक्तीचे जागरण आपल्याला करावे लागणार असल्याचे विद्यार्थ्यांना सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगे बाबांच्या प्रतिमेचे पूजन, हारार्पण करुन विद्यापीठ गीताने करण्यात आली. संचालन राजेश पिदडी यांनी केले, तर आभार प्रदर्शन मंदा नांदूरकर यांनी केले.