तासन्तास फ्रिजर बंद, कसे ठेवणार रक्त सुरक्षित? रक्तपेढीत पेच

By उज्वल भालेकर | Published: May 15, 2023 11:48 PM2023-05-15T23:48:07+5:302023-05-15T23:48:49+5:30

आठ दिवसांपासून इर्विनमध्ये विजेचा लपंडाव, रक्तपेढीत नाही जनरेटर

Close the freezer for hours, how to keep the blood safe? Embarrassment in the blood bank | तासन्तास फ्रिजर बंद, कसे ठेवणार रक्त सुरक्षित? रक्तपेढीत पेच

तासन्तास फ्रिजर बंद, कसे ठेवणार रक्त सुरक्षित? रक्तपेढीत पेच

googlenewsNext

उज्वल भालेकर, अमरावती: जिल्हा सामान्य रुग्णालयात मागील आठ दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरूच आहे. सोमवारीही रुग्णालयातील रक्तपेढी, सीटीस्कॅन, लॅबमधील विद्युत पुरवठा बंद असल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे रक्तपेढीतील रक्त सुरक्षित ठेवण्यासाठी असलेले फ्रिजरही बंद होते. त्यामुळे तासन्तास विद्युत पुरवठ्यामुळे फ्रिजर बंद राहत असेल तर रक्त सुरक्षित कसे राहील, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

एखाद्या रक्तदात्याने रक्तदान केल्यानंतर ते रक्त खराब होऊ नये यासाठी तातडीने रेफ्रिजरेटरमध्ये (फ्रिजर) ठेवले जाते. लालपेशी या रेफ्रिजरेटरमध्ये ६ डिग्री सेल्सिअसवर ४ ते ५ आठवडे सुरक्षित ठेवता येते; परंतु जर रेफ्रिजरेटर बंद राहिल्यास किंवा तापमान वाढल्यास रक्तामध्ये इन्फेक्शन (संसर्ग) होऊ शकतो. तसचे लालपेशी खराब व्हायला सुरुवात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे रक्तपेढी विभागात रक्त सुरक्षित राहावे, यासाठी विद्युत पुरवठा खंडित झाल्यास जनरेटरची सुविधा असणे गरजेचे आहे; परंतु जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढी अजूनही जनरेटरशी जोडली गेलेली नाही. त्यामुळे रुग्णालयात वारंवार खंडित होत असलेल्या वीजपुरवठ्यामुळे फ्रिजरमध्ये ठेवलेले रक्तही खराब होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच विजेअभावी रुग्णालयातील सोमवारी होणाऱ्या काही शस्त्रक्रियाही पुढे ढकलण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.

रक्तचाचण्याही थांबल्या- विविध आजारांचे निदान करण्यासाठी रक्ताची चाचणी करणे गरजेचे आहे; परंतु जिल्हा सामान्य रुग्णालयातील लॅबमधीलही विद्युत पुरवठा बंद असल्याचे चित्र सोमवारी पाहायला मिळाले. त्यामुळे या लॅबमध्ये होणाऱ्या रक्ताच्या चाचण्याही थांबल्या होत्या. त्यामुळे नातेवाइकांनाही आपल्या रुग्णांच्या अहवालाची प्रतीक्षा करावी लागली आहे.

सीटीस्कॅन, सोनोग्राफीही बंद- जिल्हा सामान्य रुग्णालयात रोज सरासरी शंभर ते दीडशे रुग्ण हे एक्स-रे, सीटीस्कॅन, सोनोग्राफीसाठी येतात; परंतु वीज नसल्याने अनेक रुग्ण हे सीटीस्कॅन, सोनोग्राफी विभागाबाहेर तासन्तास आपल्या रुग्णांना घेऊन बसल्याचे चित्र पाहायला मिळाले.

रुग्णालयात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाला दिली आहे. त्यामुळे वारंवार विद्युत खंडित होण्याचे नेमके कारण काय? हे ते सांगू शकतील. तरी या संदर्भातील आढावा घेऊन दोन ते तीन दिवसांत रुग्णालयातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुुरू आहेत. -डॉ. दिलीप सौंदळे, जिल्हा शल्यचिकित्सक, इर्विन

Web Title: Close the freezer for hours, how to keep the blood safe? Embarrassment in the blood bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.