अचलपूर केंद्रावर तूर खरेदी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 10:08 PM2018-03-20T22:08:39+5:302018-03-20T22:08:39+5:30
परिसरात मोठ्या प्रमाणात तूर उत्पादन झाले असताना खरेदी केलेली तूर ठेवण्यासाठी गोदामच शिल्लक राहिले नसल्याने अचलपूर कृषिउत्पन्न बाजार समिती यार्डात नाफेडमार्फत खरेदी थांबविण्यात आली आहे.
आॅनलाईन लोकमत
परतवाडा : परिसरात मोठ्या प्रमाणात तूर उत्पादन झाले असताना खरेदी केलेली तूर ठेवण्यासाठी गोदामच शिल्लक राहिले नसल्याने अचलपूर कृषिउत्पन्न बाजार समिती यार्डात नाफेडमार्फत खरेदी थांबविण्यात आली आहे. पुढील आदेशापर्यंत शेतकऱ्यांनी हरभरा, तूर केंद्रावर आणू नये, असे आवाहन खरेदी-विक्री संस्थेने केले आहे.
अचलपूर बाजार समिती यार्डात नाफेडची तूर खरेदी-विक्री संस्थेमार्फत खरेदी केली जात आहे. २ फेब्रुवारी रोजी त्याचा शुभारंभ करण्यात आला. १७ मार्चपर्यंत २० हजार २५ क्विंटलची खरेदी करण्यात आली. १५१८ शेतकºयांनी ही तूर विक्रीसाठी आणली होती. खरेदी केलेली तूर कारंजा घाडगे, अमरावती, परतवाडा येथील गोदामात पाठविण्यात आली आहे. माल ठेवण्यासाठी आता गोदाम शिल्लक नसल्याने खरेदी बंद करण्याची वेळ आली आहे.
हरभरा मुहूर्त होताच खरेदी बंद
हरभरा खरेदी गुरूवार १५ मार्चपासून सुरू करण्यात आली. पहिल्याच दिवशी ९० क्विंटलचे मोजमाप करण्यात आले. मात्र शुक्रवार दुसऱ्या दिवसापासूनच तूर सोबतच हरभरा खरेदी बंद करण्याची नामुष्की खरेदी-विक्री संस्थेवर आली आहे. सोमवारी खरेदी बंद झाल्याची माहिती न मिळाल्याने मोठ्या प्रमाणात तूर आणि हरभरा घेऊन आलेल्या अचलपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना परत जावे लागले. परिणामी शेतकºयांमध्ये प्रचंड रोष उफाळून आला.
गोदामाअभावी अचलपूर येथे नाफेडमार्फत सुरू असलेली हरभरा आणि तूर खरेदी सोमवारपासून बंद ठेवण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी पुढील सूचनेपर्यंत आपला शेतमाल अचलपूर येथील खरेदी केंद्रावर आणू नये.
- संतोष चित्रकार, व्यवस्थापक, खरेदी-विक्री संस्था, अचलपूर