१५ एप्रिलपासून राज्यभरातील तूर खरेदी बंद?
By admin | Published: April 13, 2017 12:12 AM2017-04-13T00:12:22+5:302017-04-13T00:12:22+5:30
तूर खरेदीसंदर्भात शेतकऱ्यांना संभ्रमात ठेवणाऱ्या शासनाने १५ एप्रिलपासून तूर खरेदी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
शासनाचे पत्र : शेतकऱ्यांना मिळणार केवळ दोन दिवस
परतवाडा : तूर खरेदीसंदर्भात शेतकऱ्यांना संभ्रमात ठेवणाऱ्या शासनाने १५ एप्रिलपासून तूर खरेदी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील पत्र बुधवारी बाजार समित्यांना पाठविण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना बाजार समितीमध्ये तूर विक्री करण्यासाठी केवळ दोन दिवसांचा अवधी मिळणार आहे.
नाफेडच्या माध्यमातून राज्यात ४ जानेवारीपासून तूर खरेदी सुरू करण्यात आली होती. मात्र विक्रमी उत्पादन झाल्यामुळे व बाजार समित्यांमधील मर्यादांमुळे तुरीची खरेदी मंदावली होती. यामुळे शेतकरी निराश झाला होता. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला हजारो क्विंटल तूर बाजार समित्यांत मोजणी अभावी शिल्लक होती. दुसरीकडे शेतकऱ्यांच्या घरी देखील तूर साठवून आहे.
तूर खरेदी बंद करण्याचे पत्र बाजार समित्यांना काही दिवसांपूर्वी मिळाले होते. यामुळे बाजार समितीने तूर खरेदी करण्यास नकार दिला होता. परिणामी शेतकरी संतापले होते. दरम्यान तूर खरेदी करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला. मात्र आता पूर्णत: तूर खरेदी बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून बाजार समित्यांनी १५ तारखेपासून तूर खरेदी करू नये, असे आदेश दिले आहेत. यांसदर्भातील पत्र बुधवारी सायंकाळी बाजार समित्यांना मिळाले असल्याचे सांगण्यात येते.
नाफेडच्या माध्यमातून तूर खरेदी केली जात आहे. मोजलेल्या तुरीचा मोबदला अद्याप शेतकऱ्यांना मिळालेला नाही. दुसरीकडे बॅकांमधून धनादेशाची रक्कम लवकर खात्यात जमा होत नसल्याने देखील शेतकरी त्रस्त झाले आहेत. (तालुका प्रतिनिधी)
१५ एप्रिलपासून तूर खरेदी केंद्र बंद करण्याचे केंद्र शासनाचे आदेश आहेत. त्यानुसार संबधित केंद्राला तसे पत्र पाठविले आहे. मात्र विहित मुदतीमध्ये आलेल्या मालाची मोजणी केली जाईल.
- अशोक देशमुख
व्यवस्थापक, व्हीसीएमएफ
शासनाने तुरीचा शेवटाचा दाणा खरेदी करण्यापर्यंत खरेदी करण्याचे जाहीर केले होते. हजारो क्विंटल तूर अजुनही शेतकऱ्यांच्या घरात आहे. परिणामी खरेदीची मुदत न वाढविल्यास शेतकरी रस्त्यावर उतरतील.
- कुलदीप काळपांडे, उपसभापती, कृ.उ. बाजार समिती अचलपूर