ढगाळ वातावरण तुरीला बाधक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 12:08 AM2017-12-06T00:08:36+5:302017-12-06T00:08:54+5:30
चार दिवसात व त्यापूर्वी असलेले ढगाळ वातावरण शेंगा धरण्याच्या अवस्थेत असलेल्या तूर पिकाला बाधक आहे.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : चार दिवसात व त्यापूर्वी असलेले ढगाळ वातावरण शेंगा धरण्याच्या अवस्थेत असलेल्या तूर पिकाला बाधक आहे. अगोदरच शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला असताना आता पाने गुंडाळणाऱ्या अळीचा वाढता प्रभाव शेतकºयांसमोर नवे संकट उभे करीत आहे.
सध्या ‘ओखी’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून वातावरण ढगाळ आहे. साधारणपणे १० डिसेंबरपर्यंत अशीच स्थिती राहणार आहे. या दरम्यान काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील पडण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरण, कधी उबदार,कधी थंडी असे वातावरण शेंगा पकडण्याच्या अवस्थेतील तूर पिकाला बाधक, तर अळीला पोषक ठरत आहे. क्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत शास्त्रज्ञांनी खरीप पिकांची पाहणी केली. तुरीवर अळींचा प्रादुर्भाव झाल्याचे नित्कर्ष निघाले. तूर पीक शेंगा धरण्याच्या तर काही ठिकाणी पक्वतेच्या अवस्थेत आहे. मात्र, वातावरण बदलाची ही स्थिती आठवडाभर राहिल्यास अळीचा प्रादुर्भावची शक्यता आहे यासाठी शेतकºयांनी व्यवस्थापन करणे गरजेचे आहे, असे उपविभागीय कृषी अधिकारी प्रीती रोडगे, कीड नियंत्रक वैशाली वानखडे, राहुल देशमुख यांनी सांगितले.
पिसारी पतंगाचे व्यवस्थापन
तुरीवरील पिसारी पतंगाने आर्थिक नुकसानीची पातळी गाठली असेल तर क्विनॉलफॉस २५ टक्के प्रवाही २८ मिली किंवा बिक्टिन बेंझोएट ५ टक्के एसजी ३ ग्रॅम किंवा क्लोरॉनट्रेनीलीप्रोल १८.५ टक्के एससी २.५ मिली प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
शेंग माशीचे व्यवस्थापन
शेंग माशीच्या व्यवस्थापनासाठी क्विनॉलफॉस २५ टक्के प्रवाही २८ मिली किंवा डेल्टामेथ्रीन २.८ इसी प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फवारणी करताना एकाच कीटकनाशकाची फवारणी लागोपाठ न करता आलटूनपालटून करावी व स्टीकरचा वापर करावा.
असे करा व्यवस्थापन
तुरीवर अळीचा प्रादुर्भाव असल्यास ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. अळी प्राथमिक अवस्थेत असल्यास एचएएनपीव्ही प्रतीहेक्टर ५०० रोगग्रस्त अळ्यांचा अर्क फवारावा. फवाºयाची कार्यक्षमता अतीनील किरणातही टिकून राहावी, यासाठी अर्धा लीटर पाण्यात ५० ग्रॅम राणीफॉल टाकून अर्कात मिसळून फवारणी करावी.
अधिक प्रादुर्भाव झाल्यास इंडोक्सिकार्ब १४.५ टक्के एस.सी. ६.६ लीटर पाण्यात किंवा स्पिनोसॅड ४५ टक्के इसी किंवा इमामेक्टीन बेंझोएट ५ टक्के एसजी ४.४ ग्रॅम,किंवा क्लोरॅनट्रेनीलीप्रोल १८.५ टक्के एस.सी.२.५ प्रती १० १० लिटर पाण्यात मिसळून फवारण्याचा असा कृषी विभागाचा सल्ला आहे.