नालवाडा परिसरात ढगफुटी; वेदर स्टेशनला नोंद ६ मिमी पावसाची

By गजानन उत्तमराव मोहोड | Published: July 17, 2024 11:07 PM2024-07-17T23:07:24+5:302024-07-17T23:07:29+5:30

शेती पिकांचे मोठे नुकसान : पीकविम्यासह शासन मदत मिळणार की नाही?

Cloudburst in Nalawada area; The weather station recorded 6 mm of rain | नालवाडा परिसरात ढगफुटी; वेदर स्टेशनला नोंद ६ मिमी पावसाची

नालवाडा परिसरात ढगफुटी; वेदर स्टेशनला नोंद ६ मिमी पावसाची

अमरावती : दर्यापूर तालुक्यातील नालवाडा व माटेगावात तीन दिवसांपूर्वी ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. हे गाव ज्या महसूल मंडळात येते, त्या खल्लार मंडळातील वेदर स्टेशनवर त्या दिवशी फक्त सहा मिमी पावसाची नोंद झालेली आहे. त्यामुळे शेती पिकांच्या नुकसानासाठी पीक विमा व शासन मदतनिधी कसा मिळणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
           
पावसाळ्यात २४ तासांत ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस झाल्यावर अतिवृष्टी झाल्याचे गृहीत धरून महसूल व कृषी यंत्रणेद्वारा आदेशाची वाट न पाहता नुकसानाचे सर्वेक्षण करण्यात येते. स्वयंचलित हवामान केंद्र असलेल्या भागात जर पाऊस पडल्यासच त्याची नोंद होईल. मात्र, त्या महसूल मंडळातील अन्य गावांत मुसळधार पाऊस झाल्यास त्याच्या नोंदी या वेदर स्टेशनवर होत नाहीत. त्यामुळे अन्य गावांत अतिवृष्टी झाल्याने पिकांचे नुकसान झाल्यास बाधित शेतकऱ्यांना पीकविम्याचा परतावा, तसेच पिकांच्या नुकसानासाठी शासन मदत मिळणे महत्त्वाचे आहे; मात्र त्या दिवशी संबंधित खल्लार मंडळातील वेदर स्टेशनवर फक्त ६ मिमी पावसाची नोंद असल्याचे स्कायमेटच्या अहवालात आहे.

नालवाडा, माटरगाव शिवारात पावसाने नुकसान झाले. येथे स्वत: भेट देऊन पाहणी केली. बाधित पिकांचे सर्व्हेक्षण करण्याचे निर्देश तलाठी व कृषी सहायकांना दिले आहेत. या पावसाची खल्लार वेदर स्टेशनला नोंद नाही. नुकसानाचा अहवाल जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात येणार असल्याचे दर्यापूरचे तहसीलदार रवींद्र कानडजे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

‘त्या’ दिवशी तालुक्यात ४.५ मिमी पावसाची नोंद
नालवाडा परिसरात मुसळधार पाऊस झाला, त्या २४ तासांत स्कायमेटच्या अहवालानुसार दर्यापूर तालुक्यात सरासरी ४.५ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. शिवाय ही गावे समाविष्ट असणाऱ्या खल्लार महसूल मंडळात ६ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. प्रत्यक्षात त्या दिवशी मुसळधार पावसाने शेतात तलाव साचले, नाल्याकाठची शेती खरडल्या गेली, तर दर्यापूर-आसेगाव रस्ता पाण्याखाली होता, याचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहे.

पावसामुळे नुकसान झालेल्या या भागातील बाधित पिकांचे पंचनामे करण्यात येईल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना पंचनाम्याबाबत सूचना केलेली आहे.
- सौरभ कटियार,
जिल्हाधिकारी
 

Web Title: Cloudburst in Nalawada area; The weather station recorded 6 mm of rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.