मुख्यमंत्र्यांचाच ड्रिम प्रोजेक्ट ‘लाॅकडाउन’ मेळघाटात टेलिमेडिसिन सेवा वाऱ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 02:46 PM2023-03-30T14:46:27+5:302023-03-30T14:50:32+5:30

आदिवासींची थट्टा कायम : म्हणे, तीन वर्षांत तपासले केवळ ३६७ रुग्ण

CM Dream Project stalled, telemedicine service in Melghat on hold | मुख्यमंत्र्यांचाच ड्रिम प्रोजेक्ट ‘लाॅकडाउन’ मेळघाटात टेलिमेडिसिन सेवा वाऱ्यावर

मुख्यमंत्र्यांचाच ड्रिम प्रोजेक्ट ‘लाॅकडाउन’ मेळघाटात टेलिमेडिसिन सेवा वाऱ्यावर

googlenewsNext

चिखलदरा (अमरावती) : देशातील पहिले डिजिटल गाव हरिसाल. आदिवासी बांधवांना नानाविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचा दावा केंद्रच नव्हे तर राज्य शासनाच्या वतीने मोठ्या दिमाखात करण्यात आला होता. मात्र, २०१६ साली सुरू करण्यात आलेली टेलिमेडिसिन सेवा अवघ्या तीन वर्षांतच गुंडाळण्यात आली. मुख्यमंत्र्यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट निधीअभावी शासकीय लालफीतशाहीत अडकला अन् बंद झाला. मेळघाटात आदिवासी बांधवांच्या जिवावर अनेक प्रयोग केले जातात. एक प्रयोग सुरू करायचा आणि अर्ध्यावर तो सोडून द्यायचा. गेल्या कित्येक वर्षांपासून हा खेळ मेळघाटात सुरू आहे.

देशात नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत असताना मेळघाटात नेटवर्कअभावी टेलिमेडिसिन (व्हिडीओ कॉन्फरन्स) केंद्र बंद पडले आहे. दुसरीकडे ई- संजीवनी आणि महात्मा फुले योजनेतून रुग्णांना लाभ आणि तपासणीचा उपक्रम राबविला जात आहे. मेळघाटातील आदिवासी रुग्णांना मुंबई, पुणे आदी ठिकाणाच्या तज्ज्ञ डॉक्टरांची मदत व्हावी वेळेवर योग्य पद्धतीचा उपचार व्हावा यासाठी सेमाडोह चिखलदरा, हरिसाल, धारणी या ठिकाणी टेलिमेडिसिन सेवा सुरू करण्यात आली.

करार संपला अन् लागले ग्रहण

सेमाडोह येथे १६ जानेवारी २०१५ रोजी सुरू करण्यात आलेली सेवा अवघ्या सात महिन्यांतच मनुष्यबळ उपलब्ध न झाल्याने बंद झाली, तर २०१६ ला हरिसाल येथे मुख्यमत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्रात टेलिमेडिसिन केंद्र थाटण्यात आले. २०१९ मध्ये मायक्रोसॉफ्ट इंडिया प्रा. लि. या कंपनीचा करार संपला आणि या सेवेलाही ग्रहण लागले. विशेष म्हणजे तीन वर्षांत केवळ ३६७ रुग्णांनाच या सेवेचा लाभ मिळाला.

ई- संजीवनी हातात, महात्मा फुलेंचा लाभ

मेळघाटात नेटवर्कची समस्या असल्याने कंपन्यांनी गाशा गुंडाळला. आता मोबाइलवर ई- संजीवनी योजनेंतर्गत रुग्णांना ॲप डाउनलोड करून त्यात आजारासंदर्भात माहिती टाकल्यावर उपचार पद्धती सांगितली जाते, तर महात्मा फुले योजनेंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंतचा लाभ दिला जात असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title: CM Dream Project stalled, telemedicine service in Melghat on hold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.