सहा अवैध सावकारांवर सहकार विभागाचे धाडसत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 09:45 PM2018-10-10T21:45:57+5:302018-10-10T21:46:22+5:30
शहरातील सहा अवैध सावकारांवर मंगळवारी सहकार व पणन विभागाच्या पथकाने एकाच वेळा धाडी टाकल्या. उशिरापर्यंत सुरू असलेल्या या कारवाईत शेकडो कोरे धनादेशासह कोट्यवधींच्या व्यवहाराची कागदपत्रे जप्त केलीत. एकाचवेळी सहा सावकारांवर धाड टाकण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच मोठी कारवाई आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरातील सहा अवैध सावकारांवर मंगळवारी सहकार व पणन विभागाच्या पथकाने एकाच वेळा धाडी टाकल्या. उशिरापर्यंत सुरू असलेल्या या कारवाईत शेकडो कोरे धनादेशासह कोट्यवधींच्या व्यवहाराची कागदपत्रे जप्त केलीत. एकाचवेळी सहा सावकारांवर धाड टाकण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच मोठी कारवाई आहे.
सहायक निबंधक कार्यालयात शहरातील अवैध सावकारीविरुद्ध तक्रारी प्राप्त होत्या. त्याअनुषंगाने जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांच्या मार्गदर्शनात सहा सहायक निबंधकांच्या पथकाने एकाचवेळी शहरातील अवैध सहा सावकारांकडे धाडी टाकल्या. यामध्ये कंवरनगरातील आंनद बुधलानी, दस्तुरनगरातील अंजली तरडेजा (बुधलानी), सत्यकृपा कॉलनीतील सुनील पंत, गाडगे नगरातील राजेंद्र चौधरी व मुदलीयार नगरातील मुरलीधर बांगडे यांचा समावेश आहे. धाडसत्र सहायक निबंधक आर.डी पालेकर, के.पी.धोपे, स्वाती गुडधे, आर.पी. सुने, ए.एस.उल्हे व आर.एम.मदार यांच्या नेतृत्वात व सहकार व पणनचे प्रत्येकी चार कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत राबविण्यात आले. प्रत्येक पथकात दोन पोलीस कर्मचारी व दोन पंचांचा सहभाग होता. पंचासमक्ष आक्षेपार्ह कागदपत्रे सील करून संबंधित कार्यालयाच्या सुपूर्द केली. या कागदपत्रांची पाहणी करून काही प्रकरणात एफआयआर व काही प्रकरणांत महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ च्या अन्वये कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सहकार विभागाने दिली.
आक्षेपार्ह कागदपत्रे सील
या धाडसत्रात शेकडो कोरे धनादेश, व्याज नमूद असणाºया चिठ्या, खरेदी खत, गहाणखत, इसार पावती आदी आक्षेपार्ह व्यवहाराचे कागदपत्र पंचासमक्ष जप्त करीत सील करण्यात आले. या कागदपत्रे पडताळणीनंतर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सहायक निबंधक के.पी.धोपे यांनी दिली.
प्राप्त तक्रारींच्या आधारे सहा अवैध सावकारांकडे धाडसत्र राबविले. आक्षेपार्ह कागदपत्रे सील करण्यात आली. फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी परवानाधारक सावकारांशीच व्यवहार करावा.
- संदीप जाधव, जिल्हा उपनिबंधक, अमरावती