ज्येष्ठांच्या लसीकरणाला को-विन ॲपचा खोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 05:00 AM2021-03-05T05:00:00+5:302021-03-05T05:00:32+5:30
प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत नोंदणीकृत रुग्णालये, केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेत नोंदणीकृत रुग्णालये तसेच राज्य शासनाच्या आरोग्य विमा योजनेत नोंदणीकृत रुग्णालये अशा योजनांमध्ये नोंदणीकृत असलेल्या आठ खासगी रुग्णालयात शासकीय निकषानुसार जागा, लस साठवणुकीची सोय, आवश्यक परिचारिका व इतर मनुष्यबळ असल्यास याठिकाणी कोरोना लसीकरण सेंटर निश्चित करण्यात येऊन गुरुवारपासून सुरू करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सध्या ज्येष्ठांसह सहव्याधी असणाऱ्या ४५ वर्षांवरील नागरिकांचेही लसीकरण सुरू आहे. या व्यक्तींनी डॉक्टरचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असल्याचे महपालिकेच्या आरोग्य यंत्रणेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तीन दिवसांत ५८० नागरिकांना लसीकरण करण्यात आले. दरम्यान चवथ्या दिवशीही को-विन ॲपचा खोडा कायम होता.
प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत नोंदणीकृत रुग्णालये, केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेत नोंदणीकृत रुग्णालये तसेच राज्य शासनाच्या आरोग्य विमा योजनेत नोंदणीकृत रुग्णालये अशा योजनांमध्ये नोंदणीकृत असलेल्या आठ खासगी रुग्णालयात शासकीय निकषानुसार जागा, लस साठवणुकीची सोय, आवश्यक परिचारिका व इतर मनुष्यबळ असल्यास याठिकाणी कोरोना लसीकरण सेंटर निश्चित करण्यात येऊन गुरुवारपासून सुरू करण्यात आले. दरम्यान, महापौर चेतन गावंडे यांनी बुधवारी पीडीएमसी व डेंटल कॉलेजमधील लसीकरण केंद्राला भेट देऊन पाहणी केली.
महापालिकेने स्थापन केले इमर्जंसी बुथ
लसीकरण लाभार्थ्यांची नोंदणी करताना ओपन स्लॉटमध्ये लाभार्थी स्वत:चा मोबाईल नंबर ‘कोविन. जीओव्ही.इन’ या वेबसाईटवर भरून येणाऱ्या ओटीपीनुसार नोंदणी करून लसीकरणाची वेळ व दिनांक स्वत: निश्चित करू शकता. रिझर्व्ह स्लॉटमध्ये स्वत: नोंदणी करणे शक्य नाही, असे लाभार्थी महापालिकेने स्थापन केलेल्या बुथवर आपली नोंदणी करून लस घेऊ शकतात.
ही कागदपत्रे महत्त्वपूर्ण
लसीकरणासाठी ६० वर्षांवरील नागरिकांनी आधारकार्ड, पॅनकार्ड, कार्यालयीन, निवडणूक ओळखपत्र इत्यादी वयाबाबतच्या योग्य पुराव्याची कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सहव्याधी असणाऱ्या नागरिकांनी वयाच्या पुराव्यासोबतच वैद्यकीय सेवा देणाऱ्या नोंदणीकृत व्यावसायिकाकडून विहीत नमुन्यात प्रमाणित केलेले प्रमाणपत्र लसीकरण केंद्रावर दाखविणे अनिवार्य आहे.
को-मॉर्बेडिटी रुग्णांना प्रमाणपत्र अनिवार्य
को-मॉर्बेडिटीमध्ये पल्मनरी आर्चरी हायपरटेन्शन आणि हायपरटेन्शन, डायबेटीज ऑन ट्रिटमेंट, अंजायना आणि हायपरटेन्शन, डायबेटीज ऑन ट्रिटमेंट व इतर आजारांचा समावेश आहे. केंद्र सरकारमार्फत वैद्यकीय सेवा देणाऱ्या नोंदणीकृत व्यावसायिक यांच्याकडून घ्यावयाच्या प्रमाणपत्राचा नमुना निश्चित करण्यात आलेल्या नमुन्यात प्रमाणपत्र अपलोड करणे बंधनकारक आहे.
खासगीत २५० रुपये डोज, शासकीय मोफत
महापालिकेच्या रुग्णालयात प्रत्येक डोज मोफत देण्यात येईल. केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत नोंदणीकृत रुग्णालये, सीव्हीसी नोंदणीकृत रुग्णालयात लस घेण्यासाठी प्रतिलाभार्थी २५० रुपये प्रतिडोज शुल्क आकारण्यात येत आहे. पहिला डोज घेतल्यानंतर लाभार्थ्याने २८ ते ४२ दिवस अंतरात दुसरा डोज घेणे बंधनकारक आहे.