पोलीस आयुक्तालयात कोचिंग संचालकांचा ‘क्लास’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 01:29 AM2019-05-30T01:29:34+5:302019-05-30T01:30:08+5:30
सुरत येथे एका कोचिंग क्लासेसच्या इमारतीतील भीषण आगीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर बुधवारी शहरातील शिकवणी वर्ग संचालकांची बैठक पोलीस आयुक्तालयात पार पडली. पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांनी शिकवणी वर्ग संचालकांना अग्निसुरक्षेविषयी मार्गदर्शन करून ठोस व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सुरत येथे एका कोचिंग क्लासेसच्या इमारतीतील भीषण आगीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर बुधवारी शहरातील शिकवणी वर्ग संचालकांची बैठक पोलीस आयुक्तालयात पार पडली. पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांनी शिकवणी वर्ग संचालकांना अग्निसुरक्षेविषयी मार्गदर्शन करून ठोस व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी पोलीस निरीक्षक, महापालिका व अग्निशमन दल अधिकारीदेखील उपस्थित होते.
सुरत येथे चौथ्या मजल्यावरील एका शिकवणी वर्गाच्या खोलीमध्ये भीषण आग लागल्यानंतर तेथील विद्यार्थ्यांनी इमारतीवरून उड्या घेतल्या. त्यामुळे २२ विद्यार्थ्यांचे जीव गेले. तेथील शिकवणी वर्ग संचालकाने अग्निसुरक्षेविषयी दक्षता न घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना इमारतीवरून उड्ड्या माराव्या लागल्या. या घटनेमुळे राज्यभरातील खासगी शिकवणी वर्गाकडे शासनाचे लक्ष वेधले गेले. यासंदर्भात वरिष्ठ स्तरावरून आदेश प्राप्त झाल्यानंतर शहर पोलीस आयुक्तालयात बुधवारी शहरातील शिकवणी वर्ग संचालकाची बैठक घेण्यात आली. या बैठकीला ६० ते ७० संचालकांनी उपस्थिती दर्शविली.
या आहेत सूचना
बैठकीला पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांनी संबोधित केले. अग्निसुरक्षेसंबंधी इमारतीतील फायर आॅडिट करणे आवश्यक आहे. शिकवणी वर्गाची इमारत स्वंतत्र असावी. आत-बाहेर जाण्याचे वेगवेगळे मार्ग, आग विझविण्याची यंत्रणा, संकटकालीन मार्ग असावा. प्रवेश व बहिर्गमनाचे छापील मॅप चिटकवून ठेवावा. त्यावर दिशानिर्देश द्यावे. एकाच इमारतीत अनेक व्यवसाय असतील, तर त्यातील हॉटेल व रेस्टॉरंट चालकांना अन्नपदार्थ बनविताना काळजी घेण्यास सांगावे. सिलिंडरचा वापर काळजीपूर्वक करण्याच्या सूचना द्यावा. वर्गखोलीत मर्यादपेक्षा अधिक विद्यार्थी नकोत. अशा सूचना सातव यांनी दिल्या. महिला सुरक्षा, सीसीटीव्ही, मुलींचे वर्ग रात्री उशिरापर्यंत नको, पोलीस, अग्निशमनचे मोबाइल क्रमांकाचे फलके लावणे आदी सूचनासुद्धा देण्यात आल्या.