मालगाडीतील कोळशाला पुन्हा आग
By admin | Published: March 29, 2016 12:03 AM2016-03-29T00:03:23+5:302016-03-29T00:03:23+5:30
मालगाडीतील कोळशाच्या डब्याला आग लागल्याची घटना सोमवार २८ मार्च रोजी घडली.
पंधरवड्यातील दुसरी घटना : बडनेरा स्थानकावर घडू शकतो अनर्थ
बडनेरा : मालगाडीतील कोळशाच्या डब्याला आग लागल्याची घटना सोमवार २८ मार्च रोजी घडली. अग्निशमन दलाला पाचारण करून ही आग आटोक्यात आणण्यात आली. पंधरवड्यात बडनेरा स्थानकावर कोळशाच्या मालगाडीला आग लागल्याची ही दुसरी घटना आहे. या ट्रॅकवरील विद्युत पुरवठा खंडित करून आग विझविली गेली.
मांजरी खदान येथून नाशिककडे जाणारी ६० डब्यांची कोळशाने भरलेली मालगाडी सोमवारी सकाळी ७ वाजता बडनेरा रेल्वे स्थानकावर पोहोचली. इंजीनपासून दहाव्या क्रमांकाच्या डब्यातील कोळशाने पेट घेतल्याची बाब चालकाच्या लक्षात येताच त्याने स्टेशन प्रबंधक आर.टी. कोटांगळे यांना माहिती दिली. अग्निशमन दलाला पाचारण करून आग विझविण्यात आली. स्टेशन प्रबंधक कोटांगळे, रेल्वे सुरक्षा बलाचे उपनिरीक्षक सुनील डोंगरे, जी.आर. साबळे, मडावी घटनास्थळी पोहोचले होते. उन्हाळ्यात घर्षणाने कोळशाला आग लागते. याशिवाय इतर कोणत्या कारणांनी तर मालगाडीतील कोळशाला आग लागते का? हे रेल्वे प्रशासन तसेच रेल्वे सुरक्षा बलाला तपासावे लागेल. (शहर प्रतिनिधी)
हाय व्होेल्टेज लाईनमुळे संभवतो अपघात
मालगाडीच्या डब्यातील कोळशाला आग लागण्याचे प्रकार वाढले आहेत. बडनेरा रेल्वे स्थानकावर दरवर्षी अशा पाच ते सात घटना घडतात. आजवर यातून मोठा अनर्थ घडला नाही. मात्र, रेल्वे स्थानकावरून गेलेल्या हाय व्होल्टेज लाईनला आगीचे लोळ भिडल्यास मोठे अग्निकांड घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आगीच्या या प्रकारांवर वेळीच अंकुश लावण्याची गरज आहे.