प्रॅक्टिससाठी बळजबरी; डॉक्टर महिलेचे जिणे मुश्कील!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:17 AM2021-09-17T04:17:14+5:302021-09-17T04:17:14+5:30
अमरावती : प्रॅक्टिससाठी बळजबरी करून एका डॉक्टर महिलेचे जिणे मुश्कील करण्यात आल्याचा प्रकार येथे उघड झाला आहे. डॉक्टरकीच्या व्यवसायातून ...
अमरावती : प्रॅक्टिससाठी बळजबरी करून एका डॉक्टर महिलेचे जिणे मुश्कील करण्यात आल्याचा प्रकार येथे उघड झाला आहे. डॉक्टरकीच्या व्यवसायातून आलेल्या रकमेसह सासरच्या मंडळीने लग्नातील दागिने, भेटवस्तू देखील हिसकावून घेतल्या.
याप्रकरणी १५ सप्टेंबरला दुपारी नागपुरीगेट पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. डॉक्टर असलेल्या विवाहितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी रिजवान खान रियासत खान पटेल, रियासत खान पटेल व तीन महिला (सर्व रा. सुभाष चौक, दरगाह रोड, मंगरूळपीर, जि. वाशिम) यांच्याविरुद्ध कलम ४९८ अ, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, पीडिताचे डिसेंबर २०१५ मध्ये लग्न झाले. लग्नानंतर विविध कारणांसाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. लग्नानंतर रिजवानखान पटेल याने फेब्रुवारी २०१६ मध्ये पीडितेकडून वैद्यकीय उपाचाराकरिता दोन लाख रुपये घेतले. त्यादरम्यान, पीडिताला मुलगा झाला. त्यानंतर तिने मंगरूळपीर येथेच डॉक्टरची प्रॅक्टिस करावी, म्हणून दबाव आणला. वैद्यकीय व्यवसायातून आलेली रक्कमदेखील पती व अन्य जणांनी आपल्याकडून हिसकावून घेतली. हा छळ सुरूच राहिला. दरम्यान, पीडिताने पती, सासरा व सासरच्या अन्य मंडळींना समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र, उलटपक्षी त्यांनी तीन लाख रुपयांची मागणी केली. पैसे दिले तरच नांदवू, अशी धमकी दिली. जुलै २०१७ ते जुलै २०१९ दरम्यान पीडिता ही माहेरी अमरावतीला असताना तिला तीन लाख रुपयांची व्यवस्था करा, अन्यथा तिला तुमच्याकडेच ठेवा, अशी धमकी फोनवरून तिच्या भावाला, कुटुंबीयांना देण्यात आली. त्यामुळे बहिणीला त्रास नको, म्हणून तिच्या भावाने एक लाख रुपये मंगरूळपीर येथे नेऊन रियासतखान पटेल याच्याकडे दिले. ते घेतल्यानंतर उर्वरित दोन लाख रुपये त्वरित द्या, अन्यथा पीडितेला आणखी त्रास देण्याची धमकी देण्यात आली. दरम्यानच्या काळात तिच्याकडील दागिने व भेटवस्तू हिसकावण्यात आल्या. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. प्रकरण महिला सहायता कक्षाकडे पाठविण्यात आले. मात्र, तेथे आपसी समझोता झाला नाही. त्यामुळे पोलीस उपायुक्तांच्या आदेशाने १५ सप्टेंबर रोजी पाचहीजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप हिवाळे करीत आहेत.
//////
कोट
तक्रारकर्ती महिला व्यवसायाने डॉक्टर आहे. तिच्यावर पती व सासरच्या अन्य मंडळीने मंगरूळपीर येथेच प्रॅक्टिस करण्यासाठी दबाव आणला. त्यातून आलेली रक्कम, लग्नातील दागिने हिसकावल्याची तक्रार नोंंदवून घेतली. पाचजणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
पुंडलिक मेश्राम,
ठाणेदार, नागपुरीगेट