लसीकरणात कोविन ॲपचा खोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:15 AM2021-01-20T04:15:13+5:302021-01-20T04:15:13+5:30
अमरावती : कोविन ॲपमध्ये लाभार्थींची नावे ‘मिसमॅच’ होत असल्याने पहिल्या टप्प्यातील लसीकरणाच्या दुसऱ्या दिवशी ५०० ऐवजी २४५ जणांचेच लसीकरण ...
अमरावती : कोविन ॲपमध्ये लाभार्थींची नावे ‘मिसमॅच’ होत असल्याने पहिल्या टप्प्यातील लसीकरणाच्या दुसऱ्या दिवशी ५०० ऐवजी २४५ जणांचेच लसीकरण झाले आहे. अशीच स्थिती राहिल्यास मोहिमेला गती कशी येणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्ह्यातील पाच केंद्रांवर हेल्थ केअर वर्करचे लसीकरण १६ जानेवारीपासून सुरू झाले आहे, रविवार व सोमवारी लसीकरण बंद राहिल्यानंतर आता दर मंगळवार ते शनिवार या चार दिवसांत लस देण्यात येणार आहे. त्यानुसार मंगळवारी मेसेज पाठविलेले लाभार्थी केंद्रावर पोहोचले असता, बहुतेकांचे नाव मिसमॅच झाले. याशिवाय सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक दोष आल्यामुळेही लस न घेताच अनेकांना परतावे लागले.
लसीकरण मोहिमेच्या पहिल्या दिवशी ऑफलाईनरीत्या व नोंदणी झालेल्या हेल्थ केअर वर्करना लस देण्यात आली. यामध्ये ५०० च्या तुलनेत ४४० जणांना लस देण्यात आली. मात्र, ऑनलाईन व कोविन ॲपच्या नोंदणीप्रमाणे लसीकरणात सातत्याने तांत्रिक अडचणी आल्यामुळे अनेकांना लसीकरणाविना परतावे लागले.
दरम्यान, विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी पीडीएमसी व जिल्हा सामान्य रुग्णालयातील केंद्राची पाहणी करतेवेळी, त्यांना या तांत्रिक अडचणीविषयी अवगत करण्यात आले. त्यांनी या सर्व अडचणी ‘ऑन द स्पाॅट’ सोडविण्याचे निर्देश दिले आहेत.
बॉक्स
केंद्रनिहाय लसीकरण
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोविशिल्डचे डोज असणाऱ्या पीडीएमसी बूथवर ४६, तिवसा ग्रामीण रुग्णालयात ५५, अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात ६०, तिवसा ग्रामीण रुग्णालयात ५५, अंजनगाव बारी येथील प्राथमिक स्वास्थ केंद्रात ४६ व कोव्हॅक्सिन डोज देण्यात येणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयात ३८ जणांचेच लसीकरण करण्यात आले.