चिमुकल्यांची सामूहिक ‘कॉपी’
By admin | Published: April 7, 2017 12:13 AM2017-04-07T00:13:49+5:302017-04-07T00:13:49+5:30
तालुक्यातील अतिदुर्गम बिबा येथील जिल्हा परिषदेच्या पूर्व माध्यमिक शाळेत शिक्षकच चिमुकल्या विद्यार्थ्यांना सामूहिक कॉपी पुरवीत असल्याचा प्रकार
शिक्षकाचा प्रताप : पं.स. उपसभापतींच्या पाहणीत प्रकार उघड
चिखलदरा : तालुक्यातील अतिदुर्गम बिबा येथील जिल्हा परिषदेच्या पूर्व माध्यमिक शाळेत शिक्षकच चिमुकल्या विद्यार्थ्यांना सामूहिक कॉपी पुरवीत असल्याचा प्रकार बुधवारी सकाळी ९.४५ वाजता उघडकीस आला. पंचायत समितीचे नवनिर्वाचित उपसभापती नानकराम ठाकरे यांनी अचानक धाड टाकल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
बिबा येथे इयत्ता पहिली ते चवथीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा असून ३१ विद्यार्थी पटावर आहेत. या चारही वर्गावर एकमेव शिक्षक सुमित राठोड असून ते त्यांच्या मर्जीनुसार शाळा चालवित असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
उपसभापतींची धाड
पंचायत समितीचे उपसभापती नानकराम ठाकरे यांनी १४ मार्च रोजी पदभार सांभाळल्यानंतर मेळघाटातील अतिदुर्गम शाळांची तपासणी मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार बिबा येथे बुधवारी सकाळी त्यांनी शाळेला आकस्मिक भेट दिली तेव्हा पटावर ३१ पैकी १८ विद्यार्थी हजर असल्याचे निदर्शनास आले. या दृश्याने मेळघाटातील शिक्षणाचा पार बोजवारा उडाल्याचे संतापजनक चित्र होते. (तालुका प्रतिनिधी)
शिक्षक म्हणाला
‘आप कौन ?’
शाळेतील हा सामूहिक कॉपीचा तमाशा बघून उपसभापती नानकराम ठाकरे वर्गखोलीत गेले. तेथे खुर्चीवर लांब पाय करून आराम करणारे शिक्षक सुमित राठोड यांना सामूहिक कॉपीबद्दल विचारताच ‘आप कौन?’ असा प्रतिप्रश्न केला. नानकराम ठाकरे यांनी स्वत:चा परिचय देताच त्याचे धाबे दणाणले. संबंधित गटशिक्षणाधिकारी गंगाधर मोहने यांच्याशी यासंदर्भात संपर्क केला असता होऊ शकला नाही.
बिबा येथील जि.प. शाळेत बुधवारी अचानक धाड टाकल्यानंतर जो प्रकार उघडकीस आला तो डोके सुन्न करणारा होता. आदिवासी विद्यार्थ्यांना वर्षभर काहीच न शिकविता कॉपी करायला शिकविले जात आहे. याबाबत कारवाईची मागणी करू.
- नानकराम ठाकरे,
उपसभापती, पंचायत समिती