विद्यापीठात १०५ कर्मचाऱ्यांची सामूहिक कोरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:14 AM2021-02-25T04:14:59+5:302021-02-25T04:14:59+5:30
अमरावती : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढला आहे. विशेषत: अमरावती आणि अचलपूर शहरात कोरोना बाधितांची संख्या नवनवीन उच्चांक गाठत आहे. ...
अमरावती : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढला आहे. विशेषत: अमरावती आणि अचलपूर शहरात कोरोना बाधितांची संख्या नवनवीन उच्चांक गाठत आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोना संक्रमण वेगाने होत आहे. त्यामुळे विद्यापीठात १०५ अधिकारी, कर्मचाऱ्यांची बुधवारी सामूहिक कोरोना चाचणी करण्यात आली. कोरोना
चाचणीसाठी वेळापत्रक ठरविण्यात आले होते.
अमरावती विद्यापीठात ३८५ कर्मचारी तर १४० शिक्षकांची संख्या आहे. गत १५ दिवसांपासून परीक्षा विभाग, लेखा विभागात कोरोना संक्रमितांची वाढत असलेली संख्या बघता विद्यापीठ कोरोनाचा हॉटस्पॉट ठरणार की काय, अशी स्थिती निर्माण होण्याचे संकेत मिळू लागले, परिणामी कुलसचिव तुषार देशमुख यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांची सामूहिक कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला. त्याअनुषंगाने विद्यापीठातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील चमू २४ फेब्रुवारी रोजी दाखल झाली होती. सकाळी ११ ते १२ वाजता दरम्यान परीक्षा विभाग, दुपारी १२ ते १२.३० वाजता प्रशासन विभाग, वित्त विभाग, विद्या विभाग, महाविद्यालयीन विभाग, दुपारी १२.३० ते १ वाजता दरम्यान विकास विभाग, अभियांत्रिकी. उद्यान, जनसंपर्क, भांडार व इतर प्रशासकीय विभाग आणि दुपारी १ ते २ वाजता दरम्यान शैक्षणिक व इतर विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. चार तासांत सुमारे १०५ अधिकारी, कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत चाचण्याचे अहवाल प्राप्त होतील, अशी माहिती कुलसचिव तुषार देशमुख यांनी दिली. कोरोना चाचणीपासून ४२५ अधिकारी व कर्मचारी वंचित असून, त्यांची चाचणी होण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन लवकरच करण्यात येणार आहे.
-----------------------------------