धार्मिक संस्थांच्या निधीतून सामूहिक विवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 11:14 PM2018-04-06T23:14:04+5:302018-04-06T23:14:40+5:30
राज्यभरातील मंदिरांकडे जमा असलेल्या निधीतून सामूहिक विवाह सोहळे करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याच्या धर्मादाय आयुक्तांनी घेतला आहे. धार्मिक संस्थांकडे जमा झालेल्या निधीतूृन राज्यभरात जवळपास साडेतीन हजार विवाह करण्यात येणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती ़: राज्यभरातील मंदिरांकडे जमा असलेल्या निधीतून सामूहिक विवाह सोहळे करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याच्या धर्मादाय आयुक्तांनी घेतला आहे. धार्मिक संस्थांकडे जमा झालेल्या निधीतूृन राज्यभरात जवळपास साडेतीन हजार विवाह करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर ३ एप्रिल रोजी येथील एकवीरादेवी मंदिर संस्थानात धर्मादाय उपायुक्त राहुल मामू यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील सर्वच संस्थाचालकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सामुदायिक विवाह समितीची नोंदणी करण्यात आली.
वडिलांकडे विवाह करण्यासाठी पैसे नाहीत म्हणून शेतकरी, गरीब कुुटुंबातील मुलींनी आत्महत्या केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. दुसरीकडे मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात दक्षिणा जमा होते. संस्थांकडील निधी सार्वजनिक असल्याने हा पैसा सामूहिक विवाहासाठी वापरण्यात येईल. प्रत्येक जिल्ह्यात त्या-त्या जिल्ह्यातील धार्मिक संस्थांची समिती बनविण्यात आली आहे. यावेळी सामूहिक विवाह आयोजन समितीचे गठण करण्यात आले. त्याच्या कार्यकारिणीची सहायक आयुक्त टी़.ए. आसलकर, दीपाली डोईफोडे व निरीक्षक जे.आर. पठाण यांनी नोंदणी केली. कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी आर.बी़ अटल, उपाध्यक्षपदी प्रवीण घुईखेडकर, सचिवपदी भास्कर टोम्पे, कोषाध्यक्षपदी शेखर भोंदू, तर सदस्यपदी अरुण रामेकर, अनिल घोन्साल्विस, प्रणय नितनवार, सुनंदा बोदीले, सुमीत महाजन, अतुल आळशी, केशव कांडलकर, प्रभाकर देवपुजारी, विद्या देशपांडे आदींचा समावेश आहे़
समितीच्या माध्यमातून सामूहिक विवाह सोहळे होणार आहेत. अमरावतीसह ३५ जिल्ह्यांमध्ये विवाह समिती स्थापन करून विवाह सोहळे घेतले जाणार आहे.
धर्मादाय उपायुक्तांचा राहणार ‘वॉच’
धार्मिक संस्थांच्या संचालकांची जी आयोजन समिती गठित केली, त्या समितीच्या कामकाजावर धर्मादाय उपायुक्तांचा ‘वॉच’ राहणार आहे़ धार्मिक संस्थांच्या निधीतून सामूहिक विवाह सोहळा आयोजिण्यासाठी धर्मादाय आयुक्तांमार्फत पाठपुरावा केला जाणार आहे. एकवीरादेवी संस्थान, अंबादेवी संस्थान, बेंडोजीबाबा संस्थान, साईबाबा ट्रस्टसह जिल्हाभरातील मोठ्या धार्मिक संस्थांचा या समितीत सहभाग आहे.