सकल जैन समाजाचा सामूहिक निषेध मोर्चा, राजकमल चौक ते जिल्हा कचेरीपर्यंत पायदळवारी
By गणेश वासनिक | Published: July 20, 2023 05:08 PM2023-07-20T17:08:12+5:302023-07-20T17:11:51+5:30
आचार्य श्री १०८ कामकुमारनंदीजी महाराज यांच्या हत्येचा सीबीआयने तपास करावा, अशी मागणी
अमरावती : कर्नाटकच्या चिक्कोडी जिल्ह्यातील हिरेकुंडी गावालगतच्या हरी पर्वत येथे विराजमान आचार्य श्री १०८ कामकुमारनंदीजी महाराज यांची असामाजिक तत्त्वांनी ६ जुत्ला निर्घृण हत्या केली. हा प्रकार अतिशय धक्कादायक असून, जैन समाजात प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे.
आचार्य श्री १०८ कामकुमारनंदीजी महाराज यांच्या हत्येचा तपास सीबीआयने करावा, आरोपींना कठोर शासन व्हावे यासाठी गुरुवारी सकल जैन समाजाच्यावतीने राजकमल चौक ते जिल्हा कचेरीपर्यंत पायदळ सामूहिक निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी महिला, पुरुषांची लक्षणीय गर्दी होती.
जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या नावे देण्यात आलेल्या निवेदनात सकल जैन समाजाने आचार्य श्री १०८ कामकुमारनंदीजी महाराज यांना विजेचा धक्का लावून बेशुद्ध करण्यात आले. नंतर त्यांच्या शरीराचे नऊ तुकडे करून ट्यूब वेलमध्ये फेकून दिले. ही घटना अमानवीय असून, यातील मुख्य आरोपींचा शोध घेण्यात यावा, या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवावा आणि जैन मुनी, संत आणि जैन मंदिरांना सुरक्षा प्रदान करावी, अशी मागणी करण्यात आली. राज्यात वक्फ बोर्डाच्या धर्तीवर जैन आयोगाची स्थापना करून समाजाला न्याय प्रदान करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री, कर्नाटक आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे.
सामूहिक निषेध मोर्चात वात्सल्य फाऊंडेशन, सकल जैन समाज, मुनीसुव्रतनाथ दिंगबर जैन सैतवाल मंदिर, आदिनाथ दिगंबर जैन परवार मंदिर, आदिनाथ दिगंबर जैन मोठे मंदिर, पार्श्वनाथ श्वेतांबर जैन बडा मंदिर, पार्श्वनाथ श्वेतांबर जैन सेनगण मंदिर, जैन दादावाडी, वर्धमान जैन स्थानक, सुपार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर, चंद्रप्रभू दिंगबर जैन मंदिर, महावीर जैन मंदिर, जय जिनेंद्र ग्रुप, ओसवाल नवयुवक संघ, सैरवाल महिला मंडळ, परवार महिला मंडळ, भातकुली जैन मंदिर यासह जैन समाजातील महिला, पुरुषांची मोठी गर्दी होती.