जिल्हाधिकारी परतवाड्यात यंत्रणा ‘अॅक्शन मोड’मध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 05:00 AM2021-02-22T05:00:00+5:302021-02-22T05:01:07+5:30
जिल्हाधिकारी शैलेश नवाल २० फेब्रुवारी रोजी सकाळी परतवाड्यात दाखल झाले. बाजारपेठेसह सदर बाजार आणि ज्या परिसरात रुग्ण अधिक निघत आहेत, त्या भागाची रस्त्यावर उतरून त्यांनी पाहणी केली. या पाहणीत त्यांना कुठेही कंटेनमेंट झोन आढळून आले नाही. मास्क न लावणाऱ्यांविरुद्ध कारवाई करणारी पथके कार्यान्वित आहेत की नाही, याची पाहणी त्यांनी केली. त्यानंतर त्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयात स्थानिक प्रशासनासमवेत बैठकही घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : अचलपूर तालुक्यातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या बघून शनिवारी जिल्हाधिकारी स्वत: परतवाड्यात पोहोचले. जिल्हाधिकाऱ्यांना ‘अॅक्शन मोड’मध्ये बघून स्थानिक प्रशासन अक्षरश: धावायला लागले.
जिल्हाधिकारी शैलेश नवाल २० फेब्रुवारी रोजी सकाळी परतवाड्यात दाखल झाले. बाजारपेठेसह सदर बाजार आणि ज्या परिसरात रुग्ण अधिक निघत आहेत, त्या भागाची रस्त्यावर उतरून त्यांनी पाहणी केली. या पाहणीत त्यांना कुठेही कंटेनमेंट झोन आढळून आले नाही. मास्क न लावणाऱ्यांविरुद्ध कारवाई करणारी पथके कार्यान्वित आहेत की नाही, याची पाहणी त्यांनी केली. त्यानंतर त्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयात स्थानिक प्रशासनासमवेत बैठकही घेतली. यात त्यांनी कंटेनमेंट झोन जाहीर करून कोविड चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला दिले. सामाजिक अंतर, निर्जंतुकीकरणासह कोरोना त्रिसूत्रीचे काटेकोर पालन करीत प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी स्थानिक प्रशसनाला दिल्यात.
कुटीर रुग्णालयातील डेडिकेटेड कोविड रुग्णालयाचाही त्यांनी भेट दिली. राज्य शासनाचे सल्लागार डॉ. सुभाष साळुंके यांच्या अचलपूर दौºयानंतर जिल्हाधिकारी शैलेश नवाल, विभागीय आयुक्त पीयूष सिंह अचलपूरच्या अनुषंगाने ‘अॅक्शन मोड’मध्ये आले आहेत.
दरम्यान, डॉ. साळुंके यांच्या नंतर मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार डॉ. दीपक म्हैसकर यांनीसुद्धा अचलपूरच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाला १९ फेब्रुवारीला सक्त निर्देश दिले आहेत. त्यानंतर स्थानिक प्रशासनाच्या हालचाली वाढल्या.
पालिका प्रशासन पोरके
अचलपूर नगरपालिका प्रशासन नियमित मुख्याधिकाऱ्यांअभावी पोरके झाले आहेत. अश्विनी वाघमळे यांच्यानंतर रुजू झालेले राजेंद्र फातले यांना जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर परिषद प्रशासनाचा अतिरिक्त प्रभार दिला गेला. त्यांचे वास्तव्य अमरावतीत आहे. ते अतिरिक्त प्रभारातच रमले. त्यातच एक आठवड्यापूर्वी त्यांचा अमरावतीला अपघात झाला आणि ते रजेवर गेले. दरम्यान, कोरोना रुग्णसंख्येमुळे अचलपूर हॉटस्पॉट बनले असतांनाही ना कंटेनमेंट झोन, ना निर्जंतुकीकरण, निर्णय कुणी घ्यावा, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
कोचिंग क्लासेसवर कारवाई
परतवाडा शहरातील दोन कोचिंग क्लासवर कारवाई करीत नगरपालिका पथकाने दंड ठोठावला. दोन हॉटेलवरही त्यांनी दंडात्मक कारवाई केली असून, तर मंगल कार्यालयाला पथकाच्या नियमित भेटी सुरू आहेत.