कलेक्ट्रेट, एक्साइजमध्ये दारूबंदीसाठी महिलांचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 10:52 PM2018-02-27T22:52:05+5:302018-02-27T22:52:05+5:30
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील येवती येथील चोरटी दारूविक्री व वरली मटक्याचे अवैध धंदे त्वरित बंद करण्यात यावे, या मागणीसाठी महिला व नागरिकांनी मंगळवारी उत्पादन शुल्क विभाग आणि जिल्हा कचेरीवर धडक दिली.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील येवती येथील चोरटी दारूविक्री व वरली मटक्याचे अवैध धंदे त्वरित बंद करण्यात यावे, या मागणीसाठी महिला व नागरिकांनी मंगळवारी उत्पादन शुल्क विभाग आणि जिल्हा कचेरीवर धडक दिली. युवा सेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश मोरोटकर व सरपंच गोकुळ राठोड यांच्या नेतृत्वात ठिय्या दिला. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित बांगर व उत्पादन शुल्क अधीक्षक प्रमोद सोनोने यांना निवेदन देण्यात आले.
येवती येथून इतरही गावांना दारूचा पुरवठा
येवती येथे काही वर्षांपासून १० ते १२ जण अवैध गावठी व देशी दारूचा व्यवसाय राजरोसपणे करीत आहेत. याशिवाय वरली मटकाही सुरू आहे. या अवैध धंद्यांमुळे गावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दिवसेंदिवस अवैध व्यवसाय वाढल्यामुळे महिला, मुली, वृद्ध यांची सुरक्षा धोक्यात आली आहे. दारू गावातच मिळत असल्याने तरुणाई या व्यसनाच्या आहारी जात आहेत. अवैध व्यवसाय करणाºयांची दादागिरी वाढली असून, परिसरातील इतर गावांतही दारूचा पुरवठा होत आहे.
या अवैध व्यवसायामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असून, येवती येथील सर्व अवैध धंदे त्वरित बंद करण्याची मागणी आंदोलकांनी जिल्हाधिकारी, उत्पादन शुल्क अधीक्षक व पोलीस अधिक्षकांकडे निवेदनाद्वारे केली. अधिकाऱ्यांनी तातडीने योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. यामध्ये युवा सेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश मारोटकर, सरपंच गोकुळ राठोड, भावेश भांबूरकर, आशिष भाकरे, सुजाता कुलुके, बेबी चिखांडे, रेखा रामटेके, ललिता चेंडकापुरे, नलू इंगळे, शारदा भाकरे, रूपाली घोडेस्वार, ज्योती नाईक, देवका बनारसे, सीता सुलताने, संजय मेश्राम, संघपाल ढोके, मनोज खोब्रागडे, रमेश राऊत, प्रशांत चव्हाण, जयप्रकाश खडसे व ग्रामस्थांचा समावेश होता.
अधिकाऱ्यांनी दिले कारवाईचे आदेश
युवा सेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी उत्पादन शुल्क व पोलीस अधीक्षकांना कारवाईच्या सूचना दिल्यात. याची दखल घेत पोलीस अधीक्षकांनी नांदगाव खंडेश्वर ठाणेदाराला धाडी टाकून कारवाईचे आदेश दिले आहेत. याशिवाय उत्पादन शुल्क विभागानेही कारवाईचे आश्वासन दिले आहे.