इन्स्टावर फेक अकाउंट बनवून कॉलेज फ्रेंडने तरुणीचे लग्न मोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 11:01 IST2024-12-10T10:55:13+5:302024-12-10T11:01:11+5:30

'ती'च्या नियोजित वराला फेक मेसेज : १५ डिसेंबरला होते लग्न

College friend broke up girl's marriage by making fake account on Instagram | इन्स्टावर फेक अकाउंट बनवून कॉलेज फ्रेंडने तरुणीचे लग्न मोडले

College friend broke up girl's marriage by making fake account on Instagram

लोकमत न्यूज नेटवर्क 
अमरावती :
येथील एका ३० वर्षीय तरुणीच्या नियोजित वराला फेक मेसेज पाठवून तिचे १५ डिसेंबर रोजी होऊ घातलेले लग्न मोडण्यात आले. तिच्याच कॉलेजमेटने इन्स्टाग्रामवर फेक अकाऊंट बनवून तिची बदनामी केली. याप्रकरणी, त्या तरुणीच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी ७ डिसेंबर रोजी संशयित आरोपी धर्मेश योगेश तन्ना (वय ३०, रा. हिवरखेड, ता. तेल्हारा) याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.


तक्रारीनुसार, फिर्यादी व आरोपी हे एकाच कॉलेजमध्ये व एकाच वर्गात शिकत होते. तेव्हापासून आरोपी हा तरूणीचा पाठलाग करून लग्न कर म्हणून बळजबरी करीत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून ती अमरावतीला भावाकडे आली. त्यानंतरही आरोपीने तिचा पाठलाग सुरूच ठेवला. दरम्यान, १० ऑगस्ट रोजी पुणे येथील विनय नामक तरुणासोबत तिचे लग्न जुळले. साक्षगंधदेखील झाले. १५ डिसेंबर रोजी लग्नाची तारीख काढण्यात आली. तरुणीचे लग्न ठरल्याचे माहीत होताच आरोपीने १५ ते २० सप्टेंबरदरम्यान फिर्यादी तरुणीच्या मोबाईलवर वारंवार फ्लॅश मेसेज पाठवले. त्यामध्ये अश्लील शिवीगाळ व तुझे लग्न होऊ देणार नाही, अशी धमकी होती. 


'तो मी नव्हेच'चा बनाव 
काही दिवसांनी आरोपी धर्मेश तन्ना याने इन्स्टाग्रामवर फेक अकाउंट बनविले. तथा त्यावरून तरुणीच्या नियोजित वराला खोटे मेसेज केले. तुम्ही ज्या मुलीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे, त्या मुलीबद्दल मला काही सांगायचे आहे. तुम्हाला माहिती नाही की, त्या मुलीचे किती मुलांशी संबंध होते. तिच्या अशा वागण्यामुळे तिला तिच्या घरच्यांनी अमरावतीला पाठविले आहे. तिचे तिच्या वहिनीचा भाऊ धर्मेश तन्ना याच्यासोबत देखील संबंध असल्याचे मेसेज पाठविले. त्यामुळे फिर्यादीचे लग्न तुटले. आरोपीने त्याच्यावर संशय येऊ नये, म्हणून स्वतःला देखील तसे मेसेज व काही अश्लील फोटो पाठवून फिर्यादीला दाखविले. आपल्याला देखील तसेच मेसेज येत असल्याचा बनाव त्याने रचला. मात्र, तो बनाव त्याचा मोबाईल चेक केला असता उघड झाला. त्यामुळे तरुणीने ठाण्यात धाव घेतली.

Web Title: College friend broke up girl's marriage by making fake account on Instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.