महाविद्यालय बघितलेच नाही, तरीही ९६ टक्के गुण
By admin | Published: January 21, 2017 12:02 AM2017-01-21T00:02:35+5:302017-01-21T00:03:50+5:30
खासगी संस्थांमार्फत संचालित विना अनुदानित शारीरिक शिक्षण महाविद्यालये आता शेवटच्या घटका मोजू लागली आहेत.
परीक्षा मॅनेज : उत्तरपत्रिकेत ‘कोड नंबर’ टाकून मूल्यांकन
गणेश वासनिक अमरावती
खासगी संस्थांमार्फत संचालित विना अनुदानित शारीरिक शिक्षण महाविद्यालये आता शेवटच्या घटका मोजू लागली आहेत. मात्र, महाविद्यालयाचे तोंडही न बघितलेल्या विद्यार्थ्यांना ‘प्रॅक्टीकल’चे ९६ टक्के गुण कसे मिळाले, हा प्रश्नच आहे. शिक्षणाच्या या बाजारावर अंकुश लावण्यात विद्यापीठ प्रशासनाला यश न आल्याने ही शारीरिक शिक्षण महाविद्यालये आजतागायत कागदोपत्रीच सुरु आहेत.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ कायद्याच्या अध्यादेश क्रमांक २ नुसार महाविद्यालयांमध्ये कोणत्याही पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेशित विद्यार्थ्यांची ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य आहे. मात्र, शारीरिक शिक्षण महाविद्यालयात ९० टक्क्यांवर परप्रांतीय विद्यार्थ्यांचे प्रवेश असताना विद्यापीठ प्रशासनाने या विद्यार्थ्यांचे हजेरीपुस्तक पडताळून पाहिले नाही.
सन १९९६-९७ पासून संस्थाचालक आणि विद्यापीठ प्रशासनाच्या मिलीभगतमुळे केवळ परीक्षांपुरती शारीरिक शिक्षण महाविद्यालये चालविली जात आहेत.
बनावट विद्यार्थी दाखविले
अमरावती : या महाविद्यालयांत केंद्रीय प्रवेशप्रणाली सुरू झाल्यामुळे संस्थाचालकांची मनमानी संपुष्टात आली आहे. २० वर्षांपासून विनाअनुदानित तत्त्वावर सुरू असलेल्या शारीरिक शिक्षण महाविद्यालयांच्या नियमबाह्य कारभाराला जबाबदार कोण, हादेखील प्रश्न आहे. कागदोपत्री प्रवेश दाखवून ही महाविद्यालये सुरू आहेत. ७० हजार ते १ लाख रूपयांपर्यंत प्रवेश शुल्क आकारून परप्रांतीय विद्यार्थ्यांना बीपीएडची पदवी देण्यात हे संस्थाचालक धन्यता मानतात. आता केंद्रीय प्रवेश प्रणालीमुळे या महाविद्यालयांना विद्यार्थी मिळत नसल्याचे विदारक चित्र निर्माण झाली आहे. आता या महाविद्यालयांना कुलूप लावल्याशिवाय पर्याय नाही. महाविद्यालयात प्रवेशित विद्यार्थी वर्षभर हजर नसताना बनावट विद्यार्थी दर्शवून प्राचार्य, प्राध्यापकांकडून प्रात्यक्षिकांचे ९६ ते ९८ गुण देण्याचे प्रकार यापूर्वी झाले आहे. मात्र, १०० पैकी ९६ गुण कसे, हे विचारण्याचे धाडस विद्यापीठ प्रशासनाने कधीही केले नाही. इतकेच नव्हे तर महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागावा, यासाठी थेट परीक्षाच ‘मॅनेज’ केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेत विशेष ‘कोड’ लिहिण्यास सांगितले जायचे. त्यानंतर मूल्यांकन विभागात चरिमिरी देऊन उत्तरपत्रिका ‘ओके ’होत असत. तासिका शिक्षणातही बनावट विद्यार्थी दर्शवून सर्व काही ‘आॅलवेल’ दाखविण्याचा या महाविद्यालयांचा कारभार दोन दशके चालला. कागदोपत्री प्रवेश, बनावट विद्यार्थी, परीक्षा मॅनेज करूनही संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून बीपीएडची पदवी देण्याचा गोरखधंदा २० वर्षे करणाऱ्यांवर कारवाई होणार काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. (क्रमश:)
कुलगुरू करतील
काय चौकशी ?
शारीरिक शिक्षण महाविद्यालयातील परीक्षा अर्ज विद्यार्थ्यांनी कधीही भरले नाहीत. हे अर्ज प्राचार्य, प्राध्यापकांनीच भरल्याची माहिती सूत्रांक डून मिळाली आहे. परीक्षा अर्जावरील विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरीसुद्धा बनावट आहेत. त्यामुळे या प्रकरणाची कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी सखोल चौकशी केल्यास संस्थाचालकांचा अजब कारभार उघडकीस येऊ शकतो.