१५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये उघडणार नाहीच, दोन आठवड्यांची प्रतीक्षाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:13 AM2021-02-12T04:13:10+5:302021-02-12T04:13:10+5:30
अमरावती : नवीन वर्षात कोरोना संसर्गाचा उद्रेक कायम आहे. जिल्ह्यात काही ठरावीक भागातच संक्रमित रुग्ण वाढत असल्याने आता गर्दी ...
अमरावती : नवीन वर्षात कोरोना संसर्गाचा उद्रेक कायम आहे. जिल्ह्यात काही ठरावीक भागातच संक्रमित रुग्ण वाढत असल्याने आता गर्दी होणार नाही, याची दक्षता जिल्हा प्रशासन घेत आहे. परिणामी १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू होणार नाही. विद्यार्थ्यांना किमान दोन आठवडे प्रतीक्षा करावी लागेल, असे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी गुरुवारी येथे स्पष्ट केले.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेच्या आढाव्यानंतर ते पत्रपरिषदेत बोलत होते. जिल्हाधिकारी नवाल यांच्या माहितीनुसार, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलसचिव तुषार देशमुख यांनी महाविद्यालये उघडण्यासाठी परवानगी मागितली हाेती. मात्र, कोरोना संसर्गाचा वेग लक्षात घेता तूर्त महाविद्यालये सुरू करता येणार नाही. यापूर्वीप्रमाणे महाविद्यांलयांना ऑनलाईन शिक्षण देता येईल. शासननिर्णयानुसार १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालयात वर्गखोल्यांमध्ये शिक्षण सुरू होणार नाही, असे जिल्हाधिकारी म्हणाले, कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेऊनच २८ फेब्रुवारीनंतर महाविद्यालये उघडण्यासाठी निर्णय घेण्यात येणार आहे. महाविद्यालयात विद्यार्थी गर्दी करणार नाही, यासाठी विद्यापीठाला अवगत केले जाणार आहे. कोविड १९ ची स्थिती सुधारली तरच महाविद्यालये सुरू होतील, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले. त्यामुळे १५ फेब्रुवारीपासून कॉलेज सुरू होतील आणि शिक्षण व्यवस्था पूर्ववत होईल, हे आता दोन आठवड्यांनंतरच स्पष्ट होणार आहे.
------------
कोरोना संसर्गाचा उच्चशिक्षणाला फटका
कोरोना संसर्गामुळे मार्चपासून महाविद्यालये बंद आहे. दरम्यान, उन्हाळी व हिवाळी २०२० परीक्षा ऑनलाईन घेण्यात आल्यात. कॉलेज नाही, ऑफलाईन शिक्षण नाही विद्यार्थी घरी कंटाळून गेले आहेत. दरम्यान, विद्यार्थी संघटनांनी महाविद्यालये सुरू करण्यासाठी आंदोलन केले. उच्चशिक्षण मंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले. एकंदरीत कोरोना संसर्गाचा उच्चशिक्षणाला फटका बसला आहे. पुन्हा महाविद्यालये उघडण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.