संगणक आॅपरेटरर्सच्या नोकरीवर गंडांतर
By Admin | Published: December 29, 2015 02:20 AM2015-12-29T02:20:54+5:302015-12-29T02:20:54+5:30
महाआॅनलाईन मार्फत गत चार वर्षांपासून कार्यरत ग्रामीण संगणक चालकांची (डाटा एन्ट्री आॅपरेटर्स) सेवा ३१
अमरावती : महाआॅनलाईन मार्फत गत चार वर्षांपासून कार्यरत ग्रामीण संगणक चालकांची (डाटा एन्ट्री आॅपरेटर्स) सेवा ३१ डिसेंबरपासून संपुष्टात येणार आहे. यामुळे ग्रामपंचायतस्तरावरील यंत्रणा प्रभावित होऊन कामकाज कोलमडणार असून तुटपुंज्या वेतनावर काम करणाऱ्या युवकांच्या नोकरीवर गंडांतर येणार आहे.
ग्रामपंचायतस्तरावरील कामांचा त्वरीत निपटारा व्हावा, यासाठी आघाडी सरकारने संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र (संग्राम) हा उपक्रम सुरू करून ग्रामपंचायतींचे संगणकीकरण केले होते. महाआॅनलाईन कंपनीद्वारा प्रत्येक जिल्ह्यात कंत्राटी पद्धतीनुसार संगणक आॅपरेटरच्या नियुक्ती करण्यात आल्या होत्या.
ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामकाजाचा घटक असलेल्या संगणक डाटा आॅपरेटर्सच्या वेतनाचा कोणताही बोजा संबंधित ग्रामपंचायतींवर पडत नाही. या कंत्राटी आॅपरेटर्सचे वेतन शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या ई-पंचायत योजनेकडून महाआॅनलाईन कंपनीमार्फत देण्यात येते. दरम्यान शासनाने संग्राम ग्रामपंचायत प्रकल्पाला केवळ ३१ डिसेंबरपर्यंतच मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे महाआॅनलाईन कंपनीने सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना ३१ डिसेंबरनंतर सेवा समाप्तीच्या नोटीस दिल्या आहेत.