रहाटगावातील कॉलनी परिसरात फसगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 01:04 AM2019-07-31T01:04:59+5:302019-07-31T01:05:24+5:30
महापालिका हद्दीतील रहाटगावातील कॉलनी परिसरात तीन दिवसांच्या पावसाने नागरिकांची फसगत केली आहे. येथे रस्तेही केलेले नसल्याने चारचाकीच नव्हे, दुचाकीदेखील ओल्या मातीत रुतत आहेत. दोन दिवसांपूर्वी स्कूल व्हॅन काढण्यासाठी क्रेनचा वापरदेखील करावा लागला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महापालिका हद्दीतील रहाटगावातील कॉलनी परिसरात तीन दिवसांच्या पावसाने नागरिकांची फसगत केली आहे. येथे रस्तेही केलेले नसल्याने चारचाकीच नव्हे, दुचाकीदेखील ओल्या मातीत रुतत आहेत. दोन दिवसांपूर्वी स्कूल व्हॅन काढण्यासाठी क्रेनचा वापरदेखील करावा लागला.
रहाटगावमधील वैष्णवी विहार, पांडे ले-आऊट हा संपूर्ण कॉलनी परिसर असूनही येथे अजूनही रस्ते, नाली यांसारख्या प्राथमिक सुविधा महापालिकेकडून पुरविले गेलेले नाहीत. मुक्तांगण शाळेमागील सागवान परिसरामध्ये जवळपास २०० ते ३०० घरांची वस्ती आहे. या भागात घर बांधतेवेळी महापालिकेकडून ६० से ७० हजार रुपये विकास कर म्हणून आकारला जातो. मात्र, आठ से दहा वर्षांपासून या भागात ना साधे रस्ते, ना नाल्या महापालिका करू शकली. आमदार या भागात कधी फिरकलेच नाहीत. नगरसेवकांचेही त्याकडे लक्ष दिले आहे.
अलीकडच्या पावसात खड्डे नाल्याच्या पाण्याने भरलेल्याने मातीच्या रस्त्यांवरील ओली काळी माती निसरडी झाली आहे. त्यामुळे वाहन घसरून आतापर्यंत अनेकांना गंभीर दुखापत झाली आहे. मुलांना शाळेत जाताना तसेच वृद्धांना रोज त्रास सहन करावा लागत आहे. येथील नागरिकांनी आतापर्यंत तत्कालीन पालकमंत्री प्रवीण पोटे, महापालिका आयुक्त, नगरसेवकांना वारंवार निवेदने दिली. पण, कोणीही दखल घेतलेली नाही. या भागात लवकरात लवकर नाली व रस्त्याची प्राथमिक सुविधा उपलब्ध केली नाही, तर महापालिकेचा कोणताही कर कोणीही भरणार नाही तसेच लोकप्रतिनिधींना बंदी घालून मतदानावरही बहिष्कार टाकू, अशा संतप्त भावना येथील नागरिक वसंत ठाकरे, रवींद्र राऊत, सुनील देशमुख, योगेश खेडकर, सचिन पडोळे, साहेबराव गोहत्रे आदींनी व्यक्त केल्या.