मेळघाटात आढळले ‘कलरफूल’ बेडूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 04:04 PM2020-08-05T16:04:24+5:302020-08-05T16:06:33+5:30
मेळघाटातील जंगलात रंगीत बेडूक आढळून आले आहे. हे दुर्मीळ रंगीत बेडूक ‘पेंटेड कलुओला’ या नावाने नोंदले गेले आहे.
अनिल कडू
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मेळघाटातील जंगलात रंगीत बेडूक आढळून आले आहे. हे रंगीत बेडूक ‘पेंटेड कलुओला’ या नावाने नोंदले गेले आहे. थंड हवामानाच्या अधिवासात हे बेडूक आढळते. मोठ्या झाडांच्या खोडातील पोकळीत ते राहते. मेळघाटातील चिखलदऱ्याकडील जंगलात याची प्रथमच नोंद घेण्यात आली आहे. बेडकांच्या १६ प्र्रजातींच्या नोंदीमुळे मेळघाटातील संपन्न जैवविविधता पुन्हा एकदा आधोरेखित झाली आहे.
परतवाडा आणि अंजनगाव सुर्जी भागात याआधी हे रंगीत बेडूक आढळले असले तरी ते मेळघाटामधील लाकडांसोबत, लाकडाच्या ढोलीतून तेथे आल्याचा दावा संशोधक तथा अमरावती स्थित श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचे प्राणिशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक गजानन वाघ यांनी केला. हे बेडूक केवळ अन् केवळ मोठ्या झाडांच्या खोडामधील पोकळीतच वास्तव्यास असतात, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. या बेडकाच्या अंगावर आकर्षक असे लाल, निळे, पिवळ्या रंगाचे ठिपके बघायला मिळतात. त्यांची ठेवण आकर्षक असून, शरीर फुगीर असते. यावरून त्यास ‘कलर बलून फ्रॉग’ही म्हटले जाते. मेळघाटात २००५ मध्ये झुलॉजिकल सर्व्हे आॅफ इंडियाचे शास्त्रज्ञ सतीश कांबळे यांनी बेडकांच्या आठ प्रजातींची नोंद घेतली. यानंतर २०१६ मध्ये गजानन वाघ यांनी आणखी नव्या तीन प्रजातींची नोंद घेतली. या बेडकांच्या ११ प्रजातींच्या नोंदीसंबंधी गजानन वाघ यांचा शोधनिबंधही २०१७ मध्ये प्रकाशित झाला.
आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशन
गजानन वाघ यांच्या मार्गदर्शनात हयात कुरेशी यांनी मेळघाटातील वेगवेगळ्या अधिवासाचा अभ्यास करीत २०१७ ते २०१९ या काळात बेडकांच्या आणखी पाच नव्या प्रजातींची नोंद घेतली फर्ग्युसन टोड, हिलक्रिकेट फ्रॉग, मलबार वार्ट फ्रॉग, मार्बल्ड सँंड फ्रॉग, पेंटेड कलुओला, डोबसॉस बॉरोविंग फ्रॉग या सहा प्रजातींची व त्यांच्या सूक्ष्म अधिवासाची नोंद प्रथमच कुरेशी आणि गजानन वाघ यांच्याकडून मेळघाटात घेण्यात आली आहे. मेळघाटातील बेडकांचे ते अभ्यासक ठरले आहेत, तर आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये १ ऑगस्ट २०२० ला या दोघांचाही शोधनिबंध प्रकाशित झाला आहे.
मेळघाटात बेडकांच्या आणखी नव्या प्रजातींची नोंद होऊ शकते. त्याकरिता दीर्घकाळ अभ्यास व संशोधन करण्याची गरज आहे. मेळघाट दुर्मीळ अशा रंगीत (कलर) बेडकाची पेंटेड कलुओला या नावाने नोंद घेण्यात आली आहे.
गजानन वाघ,
जैवविविधता अभ्यासक