मतमोजणीची आज रंगीत तालीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 11:55 PM2019-05-21T23:55:01+5:302019-05-21T23:55:24+5:30
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी २३ मे रोजी नेमाणी गोडाऊनमध्ये सकाळी ८ वाजता सुरू होणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक विभागाचा या ठिकाणी ठिय्या आहे. मंगळवारी न्यू सुविधा पोर्टलसाठी ‘डायरन’ घेण्यात आले, तर मतमोजणी प्रक्रियेमधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्याद्वारे मतमोजणीची रंगीत तालीम बुधवारी होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी २३ मे रोजी नेमाणी गोडाऊनमध्ये सकाळी ८ वाजता सुरू होणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक विभागाचा या ठिकाणी ठिय्या आहे. मंगळवारी न्यू सुविधा पोर्टलसाठी ‘डायरन’ घेण्यात आले, तर मतमोजणी प्रक्रियेमधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्याद्वारे मतमोजणीची रंगीत तालीम बुधवारी होणार आहे.
अमरावती लोकसभा मतदारसंघाचा खासदार कोण, यासाठी काऊंटडाऊन सुरू झाले आहे. निकालास विलंब लागणार असला तरी येत्या २४ तासांत याबाबतचा ट्रेंड मात्र बाहेर येणार आहे. मतमोजणीची प्रक्रिया पारदर्शी व्हावी, यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासह उपजिल्हा निवडणूक अधिकारी शरद पाटील, सहाही एआरओ, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, नायब तहसीलदार (निवडणूक) नीता लबडे यांच्यासह चौदाही नोडल अधिकारी यांच्याद्वारे मंगळवारी खातरजमा करण्यात आली.
प्रत्येक फेरीनंतर अवघ्या ५ ते १० मिनिटांमध्ये उमेदवारांना मिळालेल्या मतांची माहिती न्यू सुविधा पोर्टलवर अपलोड केली जाणार आहे तसेच मतमोजणी केंद्रावर डिस्प्ले केली जाणार आहे. याबाबतचा ‘डायरन’ म्हणजेच एकप्रकारची रंगीत तालीम जिल्हाधिकारी व सर्व एआरओ तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत यशस्वीपणे घेण्यात आली. या पोर्टलवर माहिती कशी भरली जाणार व त्याची शीट कशी निघणार, यासह अन्य विषयीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. गुरूवारी मतमोजणी असल्याने बुधवारी सर्व विधानसभांच्या मतमोजणी कक्षात याची रंगीत तालीम घेतली जाणार आहे.
१४ नोडल अधिकारी आणि त्यांची जबाबदारी
अजय लहाने (सुरक्षा), नितीन व्यवहारे (मनुष्यबळ व्यवस्थापन), नरेंद्र फुलझेले (मतमोजणी प्रशिक्षण), मनोहर कडू व मनीष फुलझेले (टपाली मतपत्रिका व ईटीपीबीएस प्रशिक्षण), हर्षवर्धन पवार (प्रसार माध्यम केंद्र), सदानंद शेंडगे (पायाभूूत व्यवस्था), अरुण रणवीर व आर. लिंगणवाड (टॅब्यूलेशन), शिरीष नाईक (वाहन व्यवस्था), अनिल टाकसाळे (भोजन व पाणी व्यवस्था), शरद पाटील (लेखन सामग्री), अरुण रणवीर (संगणक व्यवस्थापन), समाधान सोळंके (प्रतिनिधींचे ओळखपत्र वितरण, वाटप), नीता लबडे (वेतनपट), शरद पाटील (उपजिल्हानिवडणूक अधिकारी)
आज माहीत होणार एआरओ, उद्या पहाटे टेबल
मतमोजणी प्रक्रियेतील अधिकारी, कर्मचारी व निरीक्षकांना मतमोजणीसाठी त्यांचे एआरओ कोण, याची माहिती रंगीत तालीमपूर्वी दिले जाणार आहे. मात्र, प्रत्यक्ष टीम कोणती राहणार, याची माहिती गुरुवारी पहाटे दिली जाईल. पारदर्शकतेसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे रॅन्डमायझेशन केले जाणार आहे. मतमोजणीसाठी एकूण १८ फेºया होतील. १५० पर्यवेक्षक, १६० सहायक व १५० सूक्ष्म निरीक्षक आहेत.
बहुतांश अधिकारी-कर्मचारी मुक्कामाला
मतमोजणी प्रक्रियेसाठी सर्व अधिकारी, कर्मचारी व सूक्ष्म निरीक्षक यांना गुरुवारी पहाटे ५ वाजता केंद्रावर बोलाविण्यात आले. बुधवारी रंगीत तालीम आहे. त्यामुळे बहुतांश कर्मचारी हे अमरावतीला मुक्कामी राहणार आहे. त्यांची निवास व्यवस्था सिपना महाविद्यालयात केली आहे.