नव्या पिढीत वाचन संस्कृती रुजविण्यासाठी एकत्रित या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 10:24 PM2017-11-19T22:24:48+5:302017-11-19T22:25:46+5:30

वाचनातून माणसाचा सर्वांगीण विकास होतो. प्रशासनात, तसेच विविध क्षेत्रांमध्ये तज्ज्ञ, संशोधक निर्माण करण्यासाठी नव्या पिढीत वाचनाची आवड रुजविली पाहिजे.

Combined to develop a new generation reading culture | नव्या पिढीत वाचन संस्कृती रुजविण्यासाठी एकत्रित या

नव्या पिढीत वाचन संस्कृती रुजविण्यासाठी एकत्रित या

Next
ठळक मुद्देग्रंथोत्सवाचे थाटात प्रारंभ : पालकमंत्री प्रवीण पोटे यांचे भावोद्गार

अमरावती : वाचनातून माणसाचा सर्वांगीण विकास होतो. प्रशासनात, तसेच विविध क्षेत्रांमध्ये तज्ज्ञ, संशोधक निर्माण करण्यासाठी नव्या पिढीत वाचनाची आवड रुजविली पाहिजे. त्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करू या, असे आवाहन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी रविवारी येथे केले.
जिल्हा ग्रंथालय कार्यालयातर्फे ‘ग्रंथोत्सव २०१७’चे उद्घाटन करताना ना. पोटे बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक विजया डबीर होत्या. प्रमुख अतिथी म्हणून आ. अनिल बोंडे, भाजप जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, साहित्यिक रमेश अंधारे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) नीलिमा टाके, जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय बन्सोड, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, ग्रंथालय संघाचे श्रीराम देशपांडे, प्रकाशन संघटनेचे नंदकिशोर बजाज आदी उपस्थित होते.
याप्रसंगी ना. पोटे म्हणाले, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, असा संदेश घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला आहे. वाचनातून अनेक उत्तुंग व्यक्तिमत्त्व निर्माण झाली आहेत. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांमध्ये बालपणापासूनच वाचनाची गोडी निर्माण केली पाहिजे. आपल्या परिसरातील, जिल्ह्यातील मुलांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी चौफेर वाचनाची सवय रुजवली पाहिजे. माहिती-तंत्रज्ञानाने ज्ञानाचे दालन ई-लर्निंगच्या माध्यमातूनही खुले केले आहे. त्याचाही उपयोग करावा, असे पालक मंत्री म्हणाले. प्रस्ताविक संजय बन्सोड व संचालन गोपाल उताणे यांनी केले. यानंतर रमेश अंधारे यांचे ‘ग्रंथोपजिविये’ या विषयावर व्याख्यान झाले. ग्रंथोत्सवात माहिती व जनसंपर्क महासंचालनालय तसेच अनेक प्रकाशनांचे स्टॉल आहेत.
ग्रंथदिंडीत महापौर, आयुक्तांचा सहभाग
श्री संत गाडगेबाबा स्मारकापासून सकाळी ९ वाजता ग्रंथदिंडी काढण्यात आली. महापौर संजय नरवणे यांच्या हस्ते दिंडी मार्गस्थ झाली. महापालिका आयुक्त हेमंतकुमार पवार यावेळी उपस्थित होते. विविध शाळांतील मुले उत्साहाने या दिंडीत सहभागी झाली होती. ग्रंथालय चळवळीतील जिल्हाभरातून आलेले अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. बडनेरा येथील सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालयाचे प्रकाश बोरकर, विठ्ठल मेश्राम आदींनी ग्रंथदिंडीचे स्वागत केले.
सोमवार, २० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता ज्येष्ठ कवी व समीक्षक तथा अ.भा. साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांची प्रकट मुलाखत होणार आहे. त्यानंतर ‘मी सावित्री बोलतेय’ हा सांस्कृतिक कार्यक्रम व दुपारी ३.३० वाजता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सत्र होणार आहे.

Web Title: Combined to develop a new generation reading culture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.