माझ्यासोबत चल, नाहीतर अंगावर अॅसिड फेकतो; निर्जनस्थळी नेऊन केला बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 11:44 AM2021-07-19T11:44:04+5:302021-07-19T11:44:24+5:30
Amravati news अंगावर ऍसिड फेकण्याची धमकी देऊन एका तरुणीचे दुचाकीवर अपहरण करून तिला एका निर्जनस्थळी जंगलात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना गाडगेनगर ठाणे हद्दीतील रामपुरी कॅम्प परिसरात शनिवारी रात्री उघडकीस आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: : अंगावर ऍसिड फेकण्याची धमकी देऊन एका तरुणीचे दुचाकीवर अपहरण करून तिला एका निर्जनस्थळी जंगलात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना गाडगेनगर ठाणे हद्दीतील रामपुरी कॅम्प परिसरात शनिवारी रात्री उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा गुन्हा नोंदवला.
पोलीस सूत्रानुसार, राहुल बिशमदास गुलानी (राहणार रामपुरी कॅम्प) असे आरोपीचे नाव आहे. १९ वर्षीय तरुणीने यासंदर्भात गाडगेनगर पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी ही बी.कॉम. तृतीय वषार्चे शिक्षण घेत असून आरोपी हा मुलीच्या वस्तीत राहतो. मागील आठ ते नऊ महिन्यापासून तो मुलीला फोनवर त्रास देत होता. तिने त्याचा नंबर ब्लॅक लिस्टमध्ये टाकला असता, आरोपीने दुसऱ्या क्रमांकावरून फोन करणे सुरूच ठेवले. त्याने तिला व्हॉट्सप व सोशल मीडियावरसुद्धा मेसेज टाकून त्रास दिला.
ही मुलगी शनिवारी दुपारी एक ते दोनच्या सुमारास काही कामानिमित्त घराबाहेर पडली असता, ती पत्रकार कॉलनीतून दुचाकीने जात असताना आरोपीने तिला वाटेतच अडविले. तिची दुचाकी थांबवून त्याने चावी ताब्यात घेतली. त्यानंतर त्याने सोबत आणलेली ब्राऊन कलरची अॅसिडची बॉटल तिला दाखवून ऍसिड अंगावर फेकतो, अशी धमकी दिली. त्यामुळे तरुणी घाबरली. त्यानंतर त्याची दुचाकी तिथेच ठेवून तो तरुणीच्या दुचाकीवर बसला व तिला तिची दुचाकी सहकारनगरच्या दिशेने चालविण्यास सांगितली. त्यानंतर एका निर्जनस्थळी नेऊन तिचे तोंड दाबून तिच्यावर त्याने लैंगिक अत्याचार केला.
पीडिता घरी आल्यानंतर तिने हा प्रकार नातेवाईकांना सांगितला. त्यानंतर त्यांनी गाडगेनगर ठाण्यात धाव घेतली. आरोपी सध्या फरार असून आरोपीविरुद्ध कलम ३७६, ३६३, ३५४ (ड), ३४१, ५०६, ३२६ (ब) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास गाडगेनगर ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रेखा लोंढे करीत आहेत.