दिलासा, पाॅझिटिव्ह अन् पॉझिटिव्हिटीचा निच्चांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:14 AM2021-07-31T04:14:00+5:302021-07-31T04:14:00+5:30
अमरावती : जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या १५ महिन्यात पहिल्यांदा सर्वात कमी तीन संक्रमितांची नोंद गुरुवारी झाली. याशिवाय २,३०६ नमुन्यांची तपासणी ...
अमरावती : जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या १५ महिन्यात पहिल्यांदा सर्वात कमी तीन संक्रमितांची नोंद गुरुवारी झाली. याशिवाय २,३०६ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात ०.१३ टक्के पॉझिटिव्हिटीची नोंद झाली आहे. याशिवाय या ३० दिवसांत २४ दिवस संक्रमितांचा मृत्यू निरंक असल्याने जिल्ह्यास दिलासा मिळाला.
जिल्ह्यात ४ एप्रिल २०२० रोजी पहिल्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली व त्यानंतर सातत्याने संसर्ग वाढला. सद्यस्थितीत ९६,५०२ संक्रमित, १,५६१ संक्रमितांचे मृत्यू व ९४,८५६ संक्रमणमुक्त अशी जिल्ह्याची स्थिती आहे. जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. किंबहुना डेल्टा व्हायरसमुळे राज्यात दुसऱ्या लाटेची सुरुवातच अमरावती जिल्ह्यापासून झाली व जिल्ह्यात ७० हजारांवर संक्रमित व एक हजारांवर मृत्यूची नोंद या काळात झाली व मे अखेरपासून संसर्ग कमी व्हायला लागलेला आहे.
जुलै महिन्यात रोज २० च्या आत रुग्णसंख्येची नोंद होत आहे व या महिन्यात कोरोनाग्रस्तांचा मृत्यूदेखील २४ दिवस निरंक राहिले. त्यामुळे जिल्ह्याला निर्बंधापासून सूट देण्यात आलेली आहे. आता जिल्ह्याची दुसऱ्या टप्प्यात नोंद झाल्यामुळे उर्वरित निर्बंधदेखील एक-दोन दिवसांत शिथिल केले जाणार असल्याची माहिती आहे.
बॉक्स
शुक्रवारी सात संक्रमितांची नोंद
जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अहवालानुसार शुक्रवारी जिल्ह्यात सात नव्या पॉझिटिव्हची नोंद झाल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या ९६,५०२ झालेली आहे. उपचारानंतर बरे वाटल्याने आठ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत ९४,८५६ नागरिकांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. ही ९८.२९ टक्केवारी आहे.
बॉक्स
पाच दिवसांतील जिल्हा स्थिती (टक्के)
दिनांक पॉझिटिव्ह पॉझिटिव्हिटी
२५ जुलै ०६ ०.२७
२६ जुलै ०९ ०.७८
२७ जुलै ०४ ०.२१
२८ जुलै ०९ ०.३७
२९ जुलै ०३ ०.१३
३० जुलै ०७ ०.२६