दिलासा, साडेसहा टक्केच रुग्ण गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 05:00 AM2020-12-24T05:00:00+5:302020-12-24T05:01:06+5:30
जिल्ह्यात ४ एप्रिलला पहिल्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. त्यानंतर सातत्याने रुग्णसंख्या वाढत आली . सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक रुग्णसंख्या नोंदविण्यात आली व त्यानंतर कोरोना संसर्गामध्ये कमी यायला लागली. गणेशोत्सवानंतर रुग्णसंख्या वाढल्यानंतर दिवाळीपश्चातही संसर्ग वाढेल, असा अलर्ट शासनाने दिला होता. त्यादृष्टीने जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून तयारी करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : दिवाळीपश्चात कोरोना संसर्गात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात असली तरी प्रत्यक्षात रुग्णसंख्येत कमी आल्याने जिल्ह्यास दिलासा मिळाला आहे. सद्यस्थितीत कोविड हॉस्पिटलमध्ये १२३ पैकी आठ बेडवरील रुग्णांना व्हेंटिलेटर सुरू आहे. ही टक्केवारी ६.५ आहे.
जिल्ह्यात ४ एप्रिलला पहिल्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. त्यानंतर सातत्याने रुग्णसंख्या वाढत आली . सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक रुग्णसंख्या नोंदविण्यात आली व त्यानंतर कोरोना संसर्गामध्ये कमी यायला लागली. गणेशोत्सवानंतर रुग्णसंख्या वाढल्यानंतर दिवाळीपश्चातही संसर्ग वाढेल, असा अलर्ट शासनाने दिला होता. त्यादृष्टीने जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून तयारी करण्यात आली. डिसेंबरपश्चात पुन्हा दुसऱ्या लाटेची शक्यता शासनाने वर्तविली असली तरी जिल्ह्यात सद्यस्थितीत दैनंदिन ६० ते ८० कोरोनाग्रस्तांची नोंद होत आहे. त्यापेक्षा अधिक प्रमाणात रुग्णांना डिस्चार्ज देण्यात येत आहेत. जिल्ह्यात पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह होण्याचे प्रमाण उच्चांकी ९६ टक्क्यांवर आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या घटल्याने गंभीर रुग्णांची संख्यादेखील कमी झालेली आहे. त्यामुळे ऑक्सिजन सिलिंडरच्या प्रमाणातदेखील कमी आली आहे. आता पीडीएमसीसह जिल्हा सामान्य रुग्णालयात लिक्विड ऑक्सिजन टँक लावण्यात आल्यामुळे ऑक्सिजनच्या तुटवड्याची कुठलीच चिंता राहिलेली नाही.२८० पैकी ३९ रुग्णांना ऑक्सिजन सुरू आहे. या हॉस्पिटलमध्ये २६९ आयसीयू बेड आहेत. यापैकी ३९ रुग्णांना ही सुविधा सुरू आहे
गंभीर रुग्णसंख्येत दिवसेनगणी कमी
कोरोना संसर्ग घटल्याने पयार्याने गंभीर रुग्णसंख्येतही कमी आलेली आहे. दिवाळीपश्चात रुग्णसंख्येत वाढ होईल, या शक्यतेमुळे सज्ज करण्यात आलेली अन्य रुग्णालये आता ओस पडली आहेत. कोविड हॉस्पिटलमध्ये २६९ बेड, तर १६९ रुग्ण दाखल आहेत. आता चाचण्यांची संख्या वाढविल्यानंतर चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण हे आठ टक्क्यांवर आले आहे.
आता लिक्विड ऑक्सिजन सिलिंडर
यापूर्वी दररोज लहान-मोठे ३०० च्या दरम्यान ऑक्सिजन सिलिंडरचा वापर व्हायचा. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने येथील डॉ. पंजाबराव देशमुख हॉस्पिटल व जिल्हा सामान्य रुग्णालयात लिक्विड ऑक्सिजन टँक लावल्यानंतर ऑक्सिजन आता मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे यंत्रणेवरचा ताण कमी झाला आहे.
कोरोना संसर्ग घटल्याने गंभीर रुग्णांची संख्याही कमी झाली. सद्यस्थितीत ६.५ टक्के गंभीर रुग्ण उपचारार्थ दाखल आहेत. त्यामुळे ऑक्सिजनच्या वापरातदेखील कमी आलेली आहे. नागरिकांनी खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे.
- डॉ श्यामसुंदर निकम
जिल्हा शल्यचिकित्सक